लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिका लसीकरणासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. मात्र त्याच वेळी प्रतिदिन पालिका किती लस टोचणार याबाबत संभ्रम आहे. कारण पालिकेचे दिवसाला ५० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले जात आहे. मात्र प्रत्यक्षात पालिकेने सुरुवात प्रतिदिन १२ हजार लस याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तर पुढे दुसऱ्या वा तिसऱ्या टप्प्यात दिवसाला ५० हजार लसीकरण करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीला पालिकेकडून अडीच-तीन महिन्यांपासूनच तयारी करण्यात आली होती. त्यामुळेच आता लस उपलब्ध होणार म्हणताच पालिका लसीकरण मोहीम राबवण्यासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. मुंबईत आठ मुख्य लसीकरण केंद्र तयार करण्यात आली असून डॉक्टर, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर आता मुंबईतील सर्व कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत. लसीकरण केंद्र कमी पडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बीकेसी केविड सेंटरमध्ये तर अवघ्या दीड दिवसात केंद्र उभारण्यातही आले आहे. याच तयारीच्या जोरावर लस उपलब्ध झाल्याबरोबर २४ तासात लस देण्यास सुरुवात करू, असा दावा पालिकेकडून केला जात आहे.
पालिकेकडून लसीकरणाचे बारीक नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२ हजार प्रतिदिन लस याप्रमाणेच आम्ही सुरुवात करणार आहोत, असे काकाणी यांनी सांगितले आहे. तर त्यानंतर हळूहळू लसीकरणाची संख्या वाढवत मग दुसऱ्या वा तिसऱ्या टप्प्यात प्रतिदिन ५० हजार जणांचे लसीकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता पालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता केवळ लस उपलब्ध होणे बाकी आहे.