Join us

पी उत्तर वॉर्ड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 5:02 PM

पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे येथील स्लम मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : पश्चिम उपनरातील सध्या हॉटस्पॉट झालेल्या पालिकेच्या पी उत्तर वॉर्डची लोकसंख्या 8,78,981 इतकी आहे. या वॉर्ड मधील मोडत असलेल्या  मालाड पश्चिम व दिंडोशी या दोन विधानसभा मतदार संघात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष करून येथील स्लमपेक्षा गृहनिर्माण सोसायट्या व इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाला पोलिस यंत्रणेचे व सर्व लोकप्रतिनिधींचे चांगले सहकार्य मिळत आहे.पोलिसांच्या पेट्रोलिंगमुळे येथील स्लम मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

पी उत्तर वॉर्ड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची चेस द व्हायरस ही मोहिम युद्ध पातळीवर राबवण्यात येत असून झिरो कोरोना मिशनसाठी पालिका प्रशासनाचे ठोस प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पालिकेचे परिमंडळ 4 चे उपायुक्त रणजित ढाकणे यांनी लोकमतला दिली.

पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकतीच मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज, आप्पा पाडा, संतोष नगर या ठिकाणी भेट देऊन येथील भागांची पाहणी केली. तर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी देखिल या आठवड्यात पी उत्तर वॉर्डला भेट दिली होती.

अप्पर पोलिस आयुक्त दिलीप सावंत,पोलिस उपायुक्त स्वामी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे, येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. पी उत्तर वॉर्ड मधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस यंत्रणा यांच्या समन्वयातून या वॉर्ड साठी विशेष आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती उपायुक्त ढाकणे यांनी लोकमतला दिली.

 पी उत्तर वॉर्डमध्ये काल संध्याकाळ पर्यंत एकूण 1577 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये स्लम मध्ये 708 व इमारतींमध्ये 869 तर मालाड पश्चिम भागात 676 व मालाड पूर्व भागात 901 कोरोना रुग्ण आढळून आले.येथील 430 इमारती व 32 स्लम सील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाचे पादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना बाधीत रुग्ण शोधून काढण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे पी उत्तर वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण शोध मोहिमेद्वारे आत्तापर्यंत 209990 घरांचे स्क्रिनिग करण्यात आले आहे.यामध्ये घरातील सदस्यांचे स्क्रिनिग करण्यात आले.तर कुटुंबातील  नागरिकांमध्ये जर कोरोनाची लक्षणे आढळून आली त्यांची स्वॅब टेस्ट करणे,कोरोना चाचणी करणे, अलगिकरण करणे,इतरांना क्वारंटाईन करणे आदी कामे रोज युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. येथे 12 आरोग्य केंद्रातील 22 डॉक्टरांची टीम डोळ्यात तेल घालून अविरत काम करत आहे. तर शांतीलाल मुठा यांचे 5 फिरते दवाखाने विभागात कार्यरत असून स्वॅब टेस्ट करत असल्याची माहिती उपायुक्त ढाकणे यांनी शेवटी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई