Join us

राज्यातील पत्रकारांना आरोग्य कवच देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात अत्यंत निष्ठेने काम करत कोरोनाविषयक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. या काळात पत्रकार ...

मुंबई : राज्यातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात अत्यंत निष्ठेने काम करत कोरोनाविषयक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. या काळात पत्रकार बांधवांकडून अत्यंत सकारात्मक पत्रकारिता पाहायला मिळाली. यात कोरोनामुळे अनेक पत्रकारांना आपला जीवही गमवावा लागला. महाराष्ट्रातील पत्रकारांना आरोग्य विमा कवच देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच आरोग्यमंत्री या नात्याने मीदेखील ही मागणी सातत्याने लावून धरेन, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रविवारी ‘सन्मान देवदूतांचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कोरोना काळात समाजासाठी योगदान देणाऱ्या राज्यातील डॉक्टर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन, संकल्पचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. एन. कदम, राज्य मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांचे कौतुक करताना टोपे म्हणाले, कोरोनाच्या काळात आपण उणीव दाखवायचे कामदेखील सकारात्मकपणे केले. यामुळे पत्रकारितेतील आपली निष्ठा दिसून येते. व्यवसायावरील निष्ठा कामातून दाखवली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील दीड वर्षाचा काळ हा आपल्यासाठी आव्हानात्मक होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. मी विरोधी पक्षनेता असल्याने सरकारच्या उणिवा काढणारच, पण टोपे यांच्या हेतूबद्दल मात्र कोणतीही शंका नाही. विजयसिंहराजे पटवर्धन म्हणाले, मी ४५ दिवस आयसीयूमध्ये होतो. कोरोनाच्या काळात कुटुंबीयांपेक्षा जास्त सेवा आणि शुश्रूषा डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांनी केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सरकार, पक्ष आणि नेत्यांवर आपल्या शैलीत कविता केल्या व सभागृहाला खळखळून हसवले. पत्रकारांना राज्य सरकारने ५० लाखांचा विमा लागू करावा, अशीही मागणी केली. संकल्पचे डॉ. पी. एन. कदम म्हणाले, कोरोना हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा आहे. आपल्याकडे औषधांच्या पुराव्याच्या आधारे क्लिनिकल ट्रायल होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. तर संघाचे पंकज बिबवे यांनी आभार व्यक्त केले.