लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक साहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करू, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.वीज दर कमी करण्याचा संकल्प ऊर्जा विभागाने केला असून, यासाठी चालू वर्षासाठी व पुढील चार वर्षांसाठी रोड मॅप तयार करण्याचे महावितरणला निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राऊत यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे उद्योग व ऊर्जा विभाग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली.
उद्योगांना वीज दरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर ही बैठक राज्याचे उद्योग आणि खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांनी आयोजित केली होती. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्स्चेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित बजाज व इतर अधिकारी उपस्थित होते.देशात महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या विजेचा अतिरिक्त आर्थिक भार क्रॉस सबसिडीच्या रूपात महाराष्ट्रात लावण्यात आला आहे. अन्य राज्यांत शेतकऱ्यांच्या सवलतीचा भार त्या राज्याच्या वितरण कंपनीवर वा ऊर्जा विभागावर न टाकता राज्य सरकार स्वतः सहन करते. तामिळनाडू सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांना वीज दर सवलतीसाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली. राज्यात औद्योगिक विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहेत. क्रॉस सबसिडी हा घटकही हे दर जास्त असण्यास कारणीभूत आहे, असे राऊत म्हणाले.