मुंबई : सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. यासह प्रस्तावित मोठ्या सांडपाणी प्रकल्प केंद्रातून प्रक्रियेनंतर निघणाऱ्या गाळापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पही प्रस्तावित केला गेला आहे. मलजल प्रकल्प (एसटीपी) उभारणे, त्याचे प्रचालन व परिचालन यासह वीजनिर्मिती यासाठी अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईच्या नागरिकांना १०० टक्के मलनिस्सारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्र उभारत आहे. यासाठी महापालिकेचे सध्या २०६१.०७ कि.मी. लांबीचे मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे कार्यान्वित असून त्याद्वारे मुंबईच्या एकूण ८५.१५ टक्के क्षेत्रफळाला व ७७.८० टक्के लोकसंख्येला मलनिस्सारण सुविधा पुरविली जात आहे. यातून निघणारे पाणी प्रक्रिया करूनच समुद्रात सोडले जावे. हरित लवादाने यासाठी पालिकेला दंड ठोठावत लवकरात लवकर मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्देश दिले होते. त्यानुसार वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप आणि घाटकोपर या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत.मुंबईतून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन सात मलजल प्रक्रिया केंद्र तयार केले जाणार आहेत. हे केंद्र तयार झाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ निघणार आहे. या गाळापासून निर्माण होणाऱ्या जैव वायूपासून ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे.
सध्या केंद्रांचे बांधकाम करणे आणि प्रकल्प कार्यान्वित करून मलजल प्रक्रिया केंद्राचे प्रचालन व परिरक्षण करणे, आवश्यक यंत्रे-संयंत्रे बदलणे, निर्माण होणाऱ्या जैव गाळावर प्रक्रिया करणे या आदी कामे करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
प्रकल्पाच्या आराखड्याचे काम सुरू :
१) महापालिकेकडून प्रस्तावित मलजल आराखडा तयार करून बांधणी आणि प्रचालन करण्याची कामे देण्यात आली असून ही कामे प्रगतिपथावर आहेत.
२) या सात मलजल प्रक्रिया केंद्राची द्वितीय स्तर प्रक्रिया क्षमता २४६४ द.ल.लि. प्रतिदिन इतकी असून, यापैकी ५० टक्के म्हणजेच १,२३३ द.ल.लि. प्रतिदिन इतक्या पाण्यावर तृतीय स्तर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
दररोज १,४०० दशलक्ष लीटर सांडपाणी प्रक्रिया :
मुंबईत दररोज सुमारे १,४०० दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करून समुद्रात सोडल्याचे सांगितले जाते. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गाळ जमा होतो. ज्यावेळी पालिका नवीन मोठे मलजल प्रकल्प सुरू करेल तेव्हा त्यातून काही टन गाळ जमा होण्याची शक्यता आहे.