...तर सरकारचा अहंकारी स्वभाव देशालाच घेऊन बुडायला नको; रोहित पवारांची केंद्रावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 09:26 AM2019-12-03T09:26:39+5:302019-12-03T09:46:16+5:30
आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असे म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मुंबई - शहरातील एका कार्यक्रमात उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शहांना विचारलेल्या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवरुन भाष्य केलं आहे. राहुल बजाज यांच्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.
याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणतात की, केंद्र सरकार मधील मंत्री सांगत आहेत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहित आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्यावरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको असा आरोपही रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. त्यावर काही बोलले, टीका केली तर ती योग्य पद्धतीने घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगताला वाटते. या सर्व परिस्थितीवर आपण मात करायला हवी, असे उद्गार ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी मुंबईत शनिवारी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात काढले होते. त्यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वाधिक टीका आमच्यावर झालेली आहे. त्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही. हे सरकार अत्यंत पारदर्शीपणे काम करत आहे, असे स्पष्ट केलं होतं.
आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असे म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मी जन्मत:च व्यवस्थाविरोधी आहे. आपल्याला आवडणार नाही तरी सांगतो की, माझे राहुल हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी ठेवले आहे. अशी प्रस्तावना करत बजाज यांनी नथुराम गोडसे याचा देशभक्त असा उल्लेख झाल्याचा संदर्भ देत खंत व्यक्त केली. त्यावर अमित शहा यांनी, साध्वी प्रज्ञासिंह यांनी याबद्दल खुलासा केला असून संसदेत माफीदेखील मागितली आहे, असे स्पष्ट केलं होतं.