भारतासह इजिप्त-ग्रीस-रोम, लंडनच्या शिल्पकलेचा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:02 AM2023-12-03T10:02:27+5:302023-12-03T10:03:30+5:30
कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष शिल्पकला प्रदर्शनाचे आयोजन.
मुंबई :कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘प्राचीन शिल्पे, भारत, इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम’ या विशेष शिल्पकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात पहिल्यांदाच प्राचीन कलाकुसर, शिल्पकलेच्या परंपरेचा वारसा जवळून अभ्यासण्यास मिळणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने जगभरातील शिल्पकला कलारसिकांसह विद्यार्थी, अभ्यासकांना एकाच छताखाली पाहता-अभ्यासता यावी हा उद्देश आहे, हे प्रदर्शन ऑक्टोबर २०२४ पर्यंत खुले असणार आहे.
या फिरत्या संग्रहालयाच्या निमित्ताने ग्रामीण आणि शहरी भागातील चिमुरड्यांना, तसेच अन्य राज्यातील लहानग्यांना प्रदर्शन पाहता येणार आहे. या प्रदर्शनात दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय, लंडन येथील ब्रिटिश म्युझिअम, बर्लिन येथील संग्रहालय, द जे पाॅल गेटी म्युझिअम, बिहार संग्रहालय आणि मध्य प्रदेश येथील पुरातत्व - संग्रहालय संचालनालय या संस्थांचा सहभाग आहे.
मानवी जीवनातील निसर्गाची भूमिका, देवी देवतांच्या संकल्पना, सौंदर्याची संकल्पना, शिल्पांचे एकमेकांशी असलेले नाते आणि शिल्पकलेचे पैलू उलगडलेत.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात या प्रदर्शनाच्या अनुषंगाने लवकरच व्यापक व समर्पित ‘प्राचीन जगाचे दालन’ सुरू करण्यात येणार आहे. या दालनात पहिल्यांदाच जगभरातील संग्रहालय एकत्रित येऊन नवे वैश्विक दालन कलारसिक, अभ्यासकांसाठी खुले करणार आहेत. संग्रहालयात सुरू असलेले हे शिल्पदर्शन या संकल्पनेचा प्राथमिक टप्पा आहे.-सब्यसाची मुखर्जी, महासंचालक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
संग्रहालयातील या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘म्युझिअम ऑन व्हील्स’ च्या फिरत्या संग्रहालयातही याच विषयावर आधारित प्रदर्शन असेल.
प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिल्पकलेचा युरोपीय दृष्टिकोनातून नव्हे, तर भारतीय दृष्टिकोनातून आढावा घेण्यात आला आहे. येत्या काळात हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या अनुषंगाने सर्व स्तरांवर शैक्षणिक - कलात्मक उपक्रम, कार्यशाळा - शिबिर राबविण्याचा मानस आहे.
- निल मॅकग्रेगोर, सल्लागार, गेटी संग्रह आदान-प्रदान प्रकल्प