Join us  

एपीएमसीमध्ये इजिप्तचा कांदा सडला

By admin | Published: October 11, 2015 3:46 AM

कांद्याचे दर कमी करण्यासाठी इजिप्तवरून मागविण्यात आलेल्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. आकार मोठा असल्यामुळे व देशी कांद्याप्रमाणे क्वॉलिटी नसल्यामुळे मालाची

- नामदेव मोरे,   नवी मुंबईकांद्याचे दर कमी करण्यासाठी इजिप्तवरून मागविण्यात आलेल्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. आकार मोठा असल्यामुळे व देशी कांद्याप्रमाणे क्वॉलिटी नसल्यामुळे मालाची विक्री होत नाही. मोठ्या प्रमाणात कांदा सडू लागला असून, गेल्या आठवड्यात मुंबई बाजार समितीमध्ये १५ टन कांदा फेकून द्यावा लागला आहे. देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आॅगस्टमध्ये बाजारभाव गगनाला भिडले होते. किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपयांपेक्षा जास्त दराने कांदा विकला जात होता. यामुळे इजिप्तमधूनही मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. २२ आॅगस्टला ८४ टन कांद्याची आवक झाली. यानंतरही टप्प्याटप्प्याने जवळपास १ हजार टन कांदा भारतामध्ये आला होता. ४५ ते ५० रुपये दराने हा कांदा विकला गेला. परंतु कांद्याचा आकार मोठा असल्यामुळे व देशातील कांद्याप्रमाणे चवही नसल्यामुळे ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली. हॉटेलमालकांकडूनही खरेदी कमी झाली. यामुळे हा कांदा सडू लागला आहे. तसेच इजिप्तमधील झिझिनिया अलेक्झांड्रिया येथून ३० आॅगस्टला कांदा भारतामध्ये पाठविला होता. दिल्लीमधील देव भूमी कंपनीने या मालाची आयात केली होती. मागील आठवड्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा माल आला. या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवावा लागला. अद्याप यामधील कांद्याची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली नाही. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला माल मोठ्या प्रमाणात सडला आहे. जवळपास १५ टन माल दोन दिवस जेसीबीच्या साहाय्याने कचराकुंडीत फेकून द्यावा लागला. व्यापाऱ्यांनी सडलेल्या कांद्यामधून विक्रीयोग्य असणारा कांदा निवडून तो लिलावगृहामध्ये सुकत ठेवला आहे. यामध्येही खराब कांद्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु हा कांदा सुकला की विक्रीयोग्य होतो, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. देशातील कांदा ३५ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात असून, विदेशातील या कांद्याला २५ ते ३० रुपये बाजारभाव मिळत आहे.इजिप्तचा कांदा आकाराने खूपच मोठा असल्यामुळे सामान्य ग्राहक तो खरेदी करीत नाहीत. हॉटेलचालक काही प्रमाणात हा कांदा घेत आहेत. परंतु या कांद्यामुळे खाद्यपदार्थांची चव बिघडत असल्यामुळे अनेकांनी तो घेणे थांबविले आहे. कोठून आला कांदा... मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला कांदा इजिप्तमधील झिझिनिया अलेक्झांड्रिया परिसरातून आला आहे. ईजीसीटी फॉर अ‍ॅग्रिकल्चर प्राडक्ट या कंपनीने ३० आॅगस्टला पॅकिंग करून हा माल भारतामध्ये पाठविला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तो बाजारामध्ये विक्रीसाठी आला आहे. मुंबईसह पुणे, तामिळनाडूमध्येही तो विक्रीसाठी पाठविला आहे.