Join us

ईदला मद्यविक्रीच्या बंदीची मागणी

By admin | Published: December 22, 2015 1:52 AM

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने येत्या गुरुवारी राज्यात मद्यविक्रीवर बंदी घालावी की नाही, यावरून राज्याचे महसूल खाते पेचात सापडले आहे.

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने येत्या गुरुवारी राज्यात मद्यविक्रीवर बंदी घालावी की नाही, यावरून राज्याचे महसूल खाते पेचात सापडले आहे. एकीकडे राज्यतील मुस्लीम आमदारांनी ईदच्या दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी नाताळ असल्याने ‘ड्राय-डे’ घोषित करावा की नाही, असा प्रश्न सरकारसमोर आहे.मुस्लीमधर्मीयांसाठी दारू निषिद्ध आहे. त्यामुळे महावीर जयंती व गांधी जयंतीच्या धर्तीवर ईदच्या दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी आमदार नसीम खान आणि अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: पाठिंबा दिला असून, याबाबत दोन दिवसांत महसूल विभागाचा अहवाल मागवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे खान यांनी सांगितले. ईदनिमित्त मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी प्रथमच समोर आली आहे. आतापर्यंत अशी मागणी सरकारकडे कोणीही केली नव्हती. दोन समाजांचा विषय असल्यामुळे काय निर्णय घ्यावा, यावरून सरकार पेचात सापडले असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र, येत्या एक किंवा दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.