Join us  

मुंबईकरांमध्ये ईदचा उत्साह

By admin | Published: July 07, 2016 3:14 AM

महिनाभर रोजा पाळल्यानंतर बुधवारी झालेल्या चंद्र दर्शनाने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. परिणामी बुधवारी ईदची रात्र साजरी केली गेली. तर गुरूवारी

मुंबई : महिनाभर रोजा पाळल्यानंतर बुधवारी झालेल्या चंद्र दर्शनाने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. परिणामी बुधवारी ईदची रात्र साजरी केली गेली. तर गुरूवारी सकाळी ईदची नमाज आद केली जाईल.सलग ३० दिवसांचे रमजानचे उपवास पाळल्यानंतर बुधवारी रात्री ७.४५ मिनिटांने चंद्राचे दर्शन झाल्याचे सय्यद सिबताईन हैदर यांनी सांगितले. ते म्हणाले की, गुरूवारी सर्वच मशिदींमध्ये ईदची नमाज अदा केली जाईल. मात्र मिनारा मशीद, जकरिया मशीद, खडक मशीद, हांडीवाला मशीद या मशिदींमध्ये तुलनेने अधिक मुस्लिम बांधवांची ईदची नमाज पठणासाठी गर्दी असेल. मुस्लिम धर्मातील नववा महिना असलेला रमजान हा अधिक महत्त्वाचा मानला जातो. त्यात महिनाभर रोजे पाळून इंंद्रिये आणि मनावर संयम ठेवणे, तसेच बंधुत्त्वाचा संदेश देण्यात येतो. त्यानुसार सकाळपासूनच मुस्लिम बांधवांच्या घरी शिरखुरमा, सेवय्या खीरचा आस्वाद चाखण्यासाठी सर्व धर्मीयांची लगबग असेल.ईदची घोषणा केल्यानंतर बुधवारी रात्री बहुतेक मुस्लिमबहूल भागांत मुस्लिम बांधव जकात देताना दिसून आले. यामध्ये आपल्या वार्षिक उत्पन्नातील अडीच टक्के वाटा गरीब आणि गरजूंना देण्याची परंपरा आहे. बहुतेक बांधव हे ईदच्या पवित्र दिवशी ही एकहाती रक्कम गरीबांना देणे पसंत करतात. याशिवाय पिसरा म्हणजेच ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी एक ठराविक रक्कम गरिबांना दिली. याशिवाय ईदची नमाज कबूल होत नसल्याचे जाणकारांनी सांगितले. गुरूवारी सकाळी मुंबईतील सर्व मशिदींमध्ये ईदच्या नमाज पठणासाठी गर्दी होईल. तर मुंबईबाहेर ईदगाह म्हणजेच मोकळ््या मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाईल. (प्रतिनिधी)