मुंबई : मंगळवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्याने बुधवारी देशभरात रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी करण्यात येणार आहे. रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवून मुस्लिम बांधव प्रार्थना करतात. चंद्र दर्शनानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होतो व महिन्याभरानंतर चंद्र दर्शन झाल्यावर ईद साजरी केली जाते.
ईद निमित्त मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुस्लिम बहुल विभागांमध्ये बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी रात्रभर दुकाने सुरु होती. मुंबई व इतर भागात सकाळी ईदची नमाज अदा करण्यात येईल. रमजान महिना इस्लामी कालगणनेनुसार ९ वा महिना आहे. चंद्र दर्शनानंतर दिवस व महिना बदलल्याने १० महिना असलेल्या असलेल्या शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला रमजान ईद साजरी केली जाते. ईदगाह मध्ये तसेच मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येते. मुंबईत आझाद मैदानात ही नमाज अदा करण्यात येणार आहे.रमजान ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तथापि, या दिवशी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. प्रत्येक बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात येते. मात्र, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास नागरिकांसाठी सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय सुरु ठेऊन दुसऱ्या दिवशी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात यावे, असा महापालिकेने ठराव केला आहे. साप्ताहिक सुट्टीनिमित्त प्राणिसंग्रहालय ६ जून रोजी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.