मुंबई - झवेरी बाजार, काळबादेवी तसेच धनजी स्ट्रीट परिसरातील व्यापाऱ्यांच्या फसवणुकीबाबत २४ तासांत ८ गुन्हे एल टी मार्ग पोलीस ठाण्यात नोंद झाले आहे. यामध्ये दागिने, पैशांच्या बदल्यात काम पूर्ण न करून फसवणुकीबरोबर ट्रिपच्या नावाखाली गंडविण्यात आले आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.
काळबादेवीतील सोने व्यापारी रणजित पाल (४३) यांच्या तक्रारीनुसार, कारागीर संत जयदेवकर (३५) याच्याकडे विश्वासाने दागिने बनविण्यासाठी सव्वापाच लाख रुपयांचे आठ तोळे सोने दिले होते. गेल्या वर्षी ७ ते १८ डिसेंबरदरम्यान हे सोने देण्यात आले होते. मात्र, त्याने दागिने न बनवता त्या सोन्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. अखेर, तो पसार झाल्याची खात्री पटताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
त्यापाठोपाठ झवेरी बाजारातील व्यापारी रणजित मंडल (५९) यांची १ कोटी १० लाख ३१ हजार रुपयांना फसवणूक झाल्याची तक्रार २५ तारखेला देण्यात आली आहे. पालघरचा रहिवासी असलेला सेल्समन राजेंद्र रावल (४५) याच्याकडे विश्वासाने विक्रीसाठी दिलेले सोन्याचे दागिने घेऊन तो ‘नॉट रिचेबल’ झाला आहे. ७ ते १८ डिसेंबरदरम्यान ही फसवणूक झाली आहे. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी सोन्याचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यानुसार, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रावलविरोधात धनजी स्ट्रीट येथील व्यापारी अनिल पामेंचा (४५) यांनीही तक्रार दिली आहे. त्यांचीही अशाच प्रकारे २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
लाखोंचे दागिने घेऊन केला पोबारा झवेरी बाजारातील व्यापारी संदीप जैन (४२) यांना दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने मधुसूदन मंडल याने ३७ लाख २० हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. काळबादेवीतील नयन ओसवाल (३१) यांच्या तक्रारीवरून एका आंध्र प्रदेशातील खासगी कंपनीचे मालक सत्यनारायण आर दीक्षित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची १७ लाख ३५ हजारांना फसवणूक करत आरोपी ‘नॉट रिचेबल’ झाले तसेच कार्यालय बंद करून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. झवेरी बाजारातील अमृता देसाई यांची १४ लाख ८३ हजार रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपावरून विलास रायकर (५५) आणि राहील अरोरा (२२) विरोधात गुन्हा नोंदवला आहे. व्यापारी शामसिंह राव (५२) यांच्या तक्रारीवरून सुधीर मैड (५५) आणि त्यांचा मुलगा रिषभ मैडवर १५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप आहे. याप्रकरणी एल टी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे. ट्रिपही महागात... सोने कारागीर समंता सांगता (३४) यांना अक्षय ननावरे (३६) याने कुलू मनाली ट्रिपचे नियोजन करून देतो सांगून जाळ्यात ओढले. त्यांना फ्लाइट, हॉटेल बुकिंगच्या नावाखाली सव्वा चार लाखांना गंडविल्याप्रकरणी त्यांनी तक्रार दिली आहे.