मुंबई : मॉरिशसमधील मराठी मंडळ फेडरेशनला महाराष्ट्र भवनच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनला निधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
मॉरिशसमधील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिमाखदार अनावरण सोहळ्याप्रसंगी मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद प्रामुख्याने उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव पारंपरिक पोषाखात कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.