Join us

लसीच्या दुसऱ्या डोसनंतर आठ आरोग्य कर्मचाऱ्यांना काेराेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:06 AM

साैम्य लक्षणे; तिघांवर अंधेरीतील रुग्णालयात उपचार सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आठ ...

साैम्य लक्षणे; तिघांवर अंधेरीतील रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आठ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले. यातील तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अन्य पाच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे या प्रकारामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.

आठ रुग्णांपैकी तिघांवर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एक फिजिशिअन असून २० जानेवारी रोजी त्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी दुसरा डोस घेतला. त्यानंतर पुढील १० दिवसांत त्यांना काेराेनाची लक्षणे जाणवली. चाचणी केल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. गेले वर्षभर हे फिजिशिअन अतिदक्षता विभागात कार्यरत होते. तर, परळच्या केईएम रुग्णालयात कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या एका कर्मचाऱ्यालाही लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला. अशा प्रकारे दुसऱ्या डाेसनंतर एकूण आठ आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली.

* लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी तयार हाेते रोग प्रतिकारकशक्ती

डॉ. गजानन वेल्हाळ यांनी सांगितले की, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या व्यक्ती सध्या घरी विलगीकरणात असून, उपचार प्रक्रियेत आहेत. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. दोन्ही लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते. तर, डॉ. गौतम भन्साळी म्हणाले, बाॅम्बे रुग्णालयातील तिघांना लस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मुंबईव्यतिरिक्त जालना येथील आरोग्य विभागातील दोन अधिकाऱ्यांनाही लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची नोंद आहे.

.................................