Join us  

पोलिसांची आठ तास ड्युटी देवनारमध्ये सुरू

By admin | Published: May 13, 2016 3:00 AM

कधी १२ तर कधी २४ तास ड्युटी मुंबई पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून कराव्या लागत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत

समीर कर्णुक , मुंबईकधी १२ तर कधी २४ तास ड्युटी मुंबई पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून कराव्या लागत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक पोलिसांना दीर्घ आजाराला सामोर जावे लागते. यावर उपाय म्हणून देवनार पोलीस ठाण्यातील एका शिपायाने पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यासाठी सातत्याने आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. अखेर आयुक्तांकडून त्याला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर देवनार पोलीस ठाण्यात आठ तास ड्युटी सुरू करण्यात आली आहे. कमी कर्मचाऱ्यांमध्येदेखील पोलीस ठाण्यातील कामकाज कशा प्रकारे योग्य करता येईल, यावर गेल्या अनेक महिन्यांपासून देवनार पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई रवींद्र पाटील हे काम करत होते. यासाठी त्यांनी मनुष्यबळाचा सर्वे केला. त्यानंतर, त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार करून ते पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासमोर मांडले.पोलीस आयुक्तांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना एकत्र आणून एक समिती तयार केली. या समितीने काही दिवस यावर अभ्यास केला. त्यानंतर याचा रिपोर्ट आयुक्तांना दिला. आयुक्तांनी तत्काळ याला मंजुरी देत आठ तासांचा पहिला प्रयोग देवनार पोलीस ठाण्यात करण्याच्या सूचना दिल्या. या प्रयोगाला ‘८ अवर्स पॉसिबल’ असे नाव देण्यात आले. देवनार पोलीस ठाण्यात याची सुरुवात ५ मे पासून करण्यात आली. यामध्ये सकाळी सात ते दुपारी ३, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा प्रकारच्या शिफ्ट तयार करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने काही कर्मचारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे महिन्याभरात हा प्रयोग १०० टक्के पोलिसांवर करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी या वेळी दिली आहे. (प्रतिनिधी)