पोलिसांच्या आठ तास कर्तव्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:06 AM2021-01-14T04:06:57+5:302021-01-14T04:06:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या बंद झालेल्या ८ तास सेवेला पुन्हा सुरुवात होत आहे. तसेच पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या बंद झालेल्या ८ तास सेवेला पुन्हा सुरुवात होत आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या मनुष्यबळानुसार ही सेवा कायम ठेवण्यात येणार आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीची दिवस-रात्र सुरक्षा करत कायदा व सुव्यवस्था संभाळत असलेल्या मुंबई पोलिसांवर कामाचा अधिक ताण असून, आजच्या घडीलाही त्यांना तब्बल १४ ते १५ तास ड्युट्या कराव्या लागत आहेत. यात अनेकवेळा २४ तासही ड्युटी करावी लागत असून, साप्ताहिक सुट्यासुद्धा रद्द केल्या जातात. यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी याची दखल घेत, १ जानेवारी २०१७ पासून मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यात आठ तासांच्या ड्युट्यांचा निर्णय जाहीर केला आहे. वर्षभर याची अंमलबजावणीही झाली. लॉकडाऊनच्या काळात या सेवा बंद होत काही ठिकाणी १२ तास सेवा २४ तास ड्युटीची पद्धत सुरू केली.
अनलॉकच्या काळात पुन्हा बहुतांश पोलीस ठाण्यात ८ तास सेवेला सुरुवात झाली आहे.
ज्या पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ आहे, तेथे तीन पाळ्यांमध्ये कर्तव्य सुरू होऊ शकते. मात्र हा निर्णय त्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांवर अवलंबून असेल. असे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले. सगळीकडे ही सेवा सुरू करावी, अशी मागणी पोलिसांकड़ून होत आहे.