मुंबई : सुधारित २३६ प्रभाग रचनेच्या मसुद्यावर सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ८१२ सूचना व हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. एकाच दिवसात ४५४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. जोगेश्वरी पूर्व, अंधेरी विभागातून सर्वाधिक ८५ तक्रारी, तर कुलाबा, फोर्ट भागातून शून्य सूचना आल्या आहेत. यामध्ये बहुतांश आक्षेप एका प्रभागाचे दोन वॉर्डात विभाजन झाल्याबाबत आहेत. विशेष म्हणजे यावेळच्या हरकती व सूचना २०१७ (६१३)च्या तुलनेत अधिक आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभाग वाढविल्याने २३६ प्रभागांच्या सीमांकनाचा मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. तेथून हिरवा कंदील मिळाल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून हरकती व सूचना मागविल्या. सोमवारी एकाच दिवशी ४५४ सूचना व हकरती सादर झाल्या आहेत. यावर सुनावणीसाठी आयोगाने राज्याच्या वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, पालिका आयुक्त, मुंबई शहर आणि उपनगरचे जिल्हाधिकारी यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीमार्फत २२ ते २६ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेऊन २ मार्चपर्यंत अंतिम अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.
...अशा आहेत सूचना व हरकतीकांदिवली प्रभाग क्रमांक २९ आर दक्षिण हा प्रशासकीय प्रभागात येतो. मात्र, नव्या रचनेत या प्रभागाचा निम्मा भाग आर दक्षिण, तर निम्मा भाग मालाडच्या पी उत्तर प्रभागात आला आहे. प्रभाग क्रमांक २२३ सध्या बी वॉर्डाच्या हद्दीत आहे. या प्रभागाचे विभाजन बी आणि भायखळ्याच्या ई प्रभागात झाले आहे. चेंबूरजवळील नवीन टिळक नगर परिसर कुर्ला एल वॉर्डाच्या हद्दीत आहे. जुने टिळकनगर हा परिसर चेंबूर येथील एम पश्चिम वॉर्डच्या हद्दीत होता.
मात्र, नव्या रचनेत जुना टिळक नगर परिसराचा काही भाग एल वॉर्डात समाविष्ट करण्यात आला आहे, तर उर्वरित एम पश्चिममध्ये आहे. या भागातील नागरी सुविधांपासून नागरिकांचे जन्म - मृत्यूचे दाखले एम पश्चिम प्रभागामार्फत पुरवले जातात. त्यामुळे येत्या काळात प्रशासकीय कामकाजाचा गोंधळ होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. वस्ती आणि जुन्या प्रभागांचे विभाजन दोन प्रशासकीय प्रभागांमध्ये करु नये, अशा प्रमुख हरकती आहेत.