महामुंबईत आठ लाख घरांना गिऱ्हाईक नाही; केवळ ३३ हजार ७१४ घरांचीच विक्री
By मनोज गडनीस | Published: August 19, 2023 06:08 AM2023-08-19T06:08:00+5:302023-08-19T06:08:44+5:30
गतवर्षीपेक्षा प्रकल्प संख्याही २० टक्क्यांनी घटली.
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या व्याजदरवाढीचा फटका आता घरांच्या विक्रीवर होण्यास सुरुवात झाली असून, महामुंबई परिसरात तब्बल ८ लाख घरे आजही विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे. बांधकाम उद्योगातील महत्त्वपूर्ण अशा क्रेडाई या संस्थेने महामुंबई परिसरासाठी केलेल्या एका पाहणी अहवालाद्वारे ही माहिती मिळाली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात महामुंबई परिसरात आतापर्यंत केवळ ३३ हजार ७१४ घरांचीच विक्री झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महामुंबई परिसरात सध्या ८ लाख घरे विक्रीविना पडून असल्याने अनेक बांधकाम उद्योजकांनी नवे बांधकाम प्रकल्पही पुढे ढकलल्याचे दिसून येते. नव्या प्रकल्पांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटल्याचे अहवालात नमूद आहे. याची कारणमीमांसा करताना दोन कारणे प्रामुख्याने दिसून आली असून, यापैकी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हा व्याजदरवाढीशी निगडित आहे.
मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये तब्बल अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे सर्वच कर्ज महागले आहेत. देशात विविध प्रकारच्या कर्जांमध्ये गृहकर्जाची टक्केवारी सर्वांत अधिक आहे. ज्यांची गृहकर्जे सुरू आहेत अशा लोकांना तर वाढीचा फटका बसला आहेच; पण त्याचसोबत सध्याचे गृहकर्जाचे व्याजदर लक्षात घेता अनेकांनी घर खरेदीचे स्वप्न पुढे ढकलल्याचे दिसून येते.
यातील दुसरा मुद्दादेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या घरांच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा भक्कम आहे. मात्र, तरीही घरांच्या किमती कमी होताना दिसत नाही. उलट घरांच्या किमती गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या अहवालानुसार महामुंबई परिसरामध्ये घरांच्या सरासरी किमती या प्रतिचौरस फूट १७ हजार २४७ रुपये इतक्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये घरांच्या किमती या १५ हजार रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत होत्या.
लोकांना हवी आहेत छोटी घरे; मात्र बिल्डरांनी मोठी घरे बांधली. त्यामुळे घर विक्रीला लगाम बसल्याची चर्चा आहे.
घरे का महागली ?
जमिनीच्या वाढणाऱ्या किमती आणि घर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम बांधकामाची किंमत वाढण्याच्या रूपाने झाला आहे. ९ टक्के किमतीही वाढल्या.