Join us

दोघा तस्करांकडून आठ लाखांचे एमडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना अटक करून त्याच्याकडील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना अटक करून त्याच्याकडील ८० ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. नशेच्या बाजारात त्याची किमत ८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अब्दुल हमीद अब्दुल सत्तार पठाण (३६) व इसाक इकबाल हुसेन सय्यद उर्फ भाईजान (३९) अशी अटक केलेल्यांची नावे असून दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान पथकाने ही कारवाई केली.

नागपाडा, कामाठीपुरा या परिसरात अब्दुल नावाचा तस्कर ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती नागरिकांनी सोशल मीडियावरून पोलिसांना कळवली होती. त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या नेतृत्वाखालील पथक त्याचा शोध घेत होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ओरियट हॉटेलच्या परिसरात संशयास्पदरीत्या देवाणघेवाण करीत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले. हवालदार मोहम्मद अस्लम नूरमोहम्मद मुजावर यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे ८० ग्रॅम एमडी पावडर मिळाली. चौकशीत दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर यापूर्वी नागपाडा व डोंगरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. भाईजानकडून गेल्यावर्षी २५ किलो एमडी जप्त केला होता. उपनिरीक्षक अभिजित पाटील, हवालदार मुजावर याप्रकरणी तपास करीत आहेत.