Join us

होर्डिंगचे धोरण ठरवण्यासाठी आठ जणांची समिती

By जयंत होवाळ | Published: May 22, 2024 9:21 PM

या समितीत निरी, आयआयटी तञ् आणि मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

मुंबई : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी मुंबई महापालिकेने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली   आठ सदस्यांची समिती नियुक्ती केली आहे. या समितीत निरी, आयआयटी तञ् आणि मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

होर्डिंगचा आकार किती असावा याबाबत पालिकेने धोरण आखून दिले आहे. मात्र त्या धोरणाची पायमल्ली करत घाटकोपर येथे होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे एकूणच होर्डिंगचे धोरण आणखी काटेकोर करण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठीच समितीची नियुक्ती झाली आहे.  पालिकेने नियुक्त केलेल्या समितीत नॅशनल एन्व्हॉयर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी अधिकारी राकेश  कुमार , आयआयटी मुंबईचे प्रा. अवजीत माजी , प्रा. नागेंद्र  राव  , इंडस्ट्रिअल डिझाईन विभागाचे श्रीकुमार, वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त अनिल कुंभारे, पालिका उपायुक्त  (विशेष) किरण दिघावकर आणि परवाना विभागाचे निरीक्षक अनिल काटे यांचा समावेश आहे.

होर्डिंगवरील  रोषणाई, त्याचा वाहनचालकांना होणार त्रास, मोठ्या होर्डिंगवरील प्रखर उजेड  , नागरी विभागात उभारले जाणारे होर्डिंग,  रात्री प्रखर उजेडामुळे होणारे प्रदूषण, पर्यावरणीय, आरोग्य तसेच वाहतूक सुरक्षा, अशा विविध बाजू लक्षात  घेऊन ही समिती काम करेल.  एक ते दोन महिन्यात समितीचा अहवाल अपेक्षित आहे. होर्डिंग संदर्भात नवे धोरण येत नाही, तोपर्यंत एकही नवे होर्डिंग उभारण्यास परवानगी  दिली जाणार नाही, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच  स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबई