तीन दिवसांत आठ लाखांचा दंड; अनधिकृत पार्किंगवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:32 AM2019-11-22T01:32:18+5:302019-11-22T01:32:32+5:30
वाहतूककोंडी वाढल्याने १३६ वाहनांकडून वसुली
मुंबई : रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. पाच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची गती मधल्या काही काळात मंदावली होती. वाहतूककोंडीची समस्या वाढत असल्याने या कारवाईने वेग घेतला आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांमध्ये १३६ वाहनांवर कारवाई करून आठ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या पाचशे मीटर परिसरात आढळून येणाºया अनधिकृत पार्किंगवर जुलै महिन्यात कारवाईला सुरुवात झाली. या कारवाई अंतर्गत थेट १० हजार रुपये दंड करण्यात येत असल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. पालिकेने पाच महत्त्वाच्या रस्त्यांलगतच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई सुरू केली. त्याचबरोबर ‘नो पार्किंग झोन’ परिसरात बसगाड्या व अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवरही कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईला काही ठिकाणी विरोध झाला. दंडाची रक्कम कमी करण्याची मागणीही होऊ लागली. मात्र कारवाई सुरूच राहिल्याने सार्वजनिक वाहनतळांवर वाहन उभे करण्याचे प्रमाण वाढले. या सर्व कारवाई अंतर्गत १८ ते २० नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये १३६ वाहनचालकांकडून आठ लाख ८९ हजार ४३५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाईत ३९ अवजड वाहने, ७९ चार चाकी, ५ तीन चाकी आणि एका दुचाकीचा समावेश आहे.
तपशील कारवाईचा
महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतचे ५०० मीटर अंतर - ८५ वाहने - ७९ चार चाकी, ५ तीन चाकी व एक दुचाकी - दंडाची रक्कम ६ लाख १३ हजार ६३५ रुपये
पाच महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग - (दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड) - १२ वाहने - ७५ हजार रुपये दंड.
नो पार्किंग झोन परिसर - ३९ वाहने -३८ बसगाड्या व १ ट्रक - २ लाख ८०० रुपये दंड.