आठ महिन्यांत २ हजार ५०० जणांना नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:43 AM2018-04-15T05:43:47+5:302018-04-15T05:43:47+5:30
मुंबईत आॅगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेल्या बाइक अॅम्बुलन्सच्या प्रकल्पाने अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. आठ महिन्यांत शहर-उपनगरांतील तब्बल अडीच हजार रुग्णांना या अॅम्बुलन्सच्या माध्यमातून नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.
मुंबई : मुंबईत आॅगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेल्या बाइक अॅम्बुलन्सच्या प्रकल्पाने अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. आठ महिन्यांत शहर-उपनगरांतील तब्बल अडीच हजार रुग्णांना या अॅम्बुलन्सच्या माध्यमातून नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. अल्पावधीतच या सेवेसाठीच्या १०८ क्रमांकावर दिवसाला शेकडो फोन येत आहेत. या माध्यमातून दिवसाला सुमारे १०० पेक्षा अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात आहेत.
विशेषत: शहर-उपनगरांतील रेल्वे स्थानकांचा परिसर, चिंचोळ्या गल्ल्यांतून कॉल येण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, ठाकूर व्हिलेज, कलिना आणि खारदांडा या ठिकाणी मोबाइल अॅम्बुलन्स सेवेत आहेत. आॅगस्ट २०१७ ते मार्च २०१८ कालावधीत २५०० हून अधिक रुग्णांना या सेवेच्या माध्यमातून तत्काळ प्रतिसाद आणि प्राथमिक उपचार दिले आहेत. त्यात अपघातातील जखमी अशा रुग्णांची संख्या २६७ असून विविध वैद्यकीय आपत्कालीन मदतीसाठी १ हजार ३७९ रुग्णांना प्रतिसाद देण्यात
आला आहे. बाइक अॅम्बुलन्सवरील चालक डॉक्टर असल्याने कॉल येताच तत्काळ प्रतिसाद दिला जातो. रुग्णाची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करून आवश्यकता भासल्यास त्या रुग्णाला पुढील उपचाराकरिता आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते.
गेल्या वर्षी सँडहर्स्ट रोडवर इमारत कोसळल्याच्या घटनेत नागपाडा पोलीस स्टेशनजवळ असलेल्या बाइक अॅम्बुलन्सने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि या ठिकाणी जखमी झालेल्या पाच रुग्णांना तातडीने प्रतिसाद दिला.
मुंबईत १० बाइक अॅम्बुलन्स -आरोग्यमंत्री
मुंबईत बाइक अॅम्बुलन्सला लाभलेला प्रतिसाद पाहता राज्यात नव्याने
३० बाइक अॅम्बुलन्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री
डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट या डोंगराळ भागात २० बाइक अॅम्बुलन्स सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अजून १० बाइक अॅम्बुलन्स मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.