उच्च न्यायालयासाठी आठ नवे न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:48 AM2019-09-28T03:48:39+5:302019-09-28T03:48:53+5:30
नव्या नेमणुकांनी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ७५ होईल. तरीही १९ पदे रिकामी राहतील.
मुंबई : अमित बी. बोरकर, एम.जी. शेवलीकर, व्ही. जी. बिश्त, बी. यू. देबडवार, एम. एस. जवळकर, एस.पी. तावडे, एम. आर. बोरकर आणि एस.डी. कुलकर्णी या आठ जणांची मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने शुक्रवारी केली. यापैकी अमित बोरकर हे ज्येष्ठ वकील आहेत तर इतर जिल्हा न्यायाधीश आहेत. या नव्या नेमणुकांनी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ७५ होईल. तरीही १९ पदे रिकामी राहतील.
ज्यांचे वय साडेअठ्ठावन्न वर्षांहून जास्त असेल अशा व्यक्तींचा उच्च न्यायालयावर नेमणुकीसाठी सर्वसाधारणपणे विचार केला जात नाही. मात्र देबडवार, तावडे व कुलकर्णी यांची वये साठीकडे झुकलेली असूनही नियमाला अपवाद करून त्यांची निवड केली गेली. यासाठी या तिघांचे न्यायाधीश म्हणून उत्तम काम आणि गुण याचा विचार केला गेला. शिवाय सुमारे ३० टक्के पदे रिकामी असल्याने या उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी आहे, हेही विचारात घेतले गेले. हे तिघे जेमतेम दोन वर्षे उच्च न्यायालयात काम करू शकतील.
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी ११ मार्च रोजी ही आठ नावे कोलेजियमकडे पाठवली होती. हे करताना सेवाज्येष्ठतेत वरच्या क्रमांकावर असलेल्या तीन जिल्हा न्यायाधीशांना डावलले गेले होते. यासाठी दिलेल्या कारणांशी कोलेजियमणे सहमती दर्शवली.