Join us

वृद्ध महिला तस्करासह आठ जणांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:49 AM

पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांच्या आदेशाने बुधवारी भांडुपमध्ये अमलीपदार्थविरोधी पथकाने छापे टाकले.

मुंबई : पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांच्या आदेशाने बुधवारी भांडुपमध्ये अमलीपदार्थविरोधी पथकाने छापे टाकले. या कारवाईत त्यांनी भांडुप आणि विक्रोळीतून एका वृद्ध महिलेसह ८ जणांना गांजाच्या तस्करीप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.भांडुपमध्ये गेल्या काही दिवसांत गँगवॉरने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात या वर्षीच्या मार्च ते जुलै दरम्यान ७ जणांची हत्या झाली. हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण हे प्रकार सुरूच आहेत. याविरोधात भांडुपकरांनी आवाज उठवत पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यानंतर भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांची उचलबांगडी करत त्यांची रवानगी सशस्त्र पोलीस दलात करण्यात आली.याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री घाटकोपरच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने भांडुपमध्ये छापे टाकले आणि भांडुपमधील तस्कर रडारवर आले. या कारवाईत त्यांना ८ जणांना अटक केली. यामध्ये दोन महिला तस्करांचाही समावेश आहे. कारवाईत तुलशेतपाडा येथील विजय पंडित (२६), सोनापूरमधील मुश्तफा शेख (२१) आणि कमलेश गौतम (२६), मिश्रा चाळीमध्ये राहणारा शक्ती पुजारा (३२), तसेच भांडुपमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या विक्रोळी पार्कसाइटमधील उत्तम कांबळे (४६) आणि पवई येथील साईपन सांगोली (२१) यांच्यासह गावदेवी येथील तयाबाई वाडेकर (६५) आणि मंगतराम पेट्रोल पंप येथील जासुन्दा गायकवाड (५०) या दोन महिला ड्रग्स विक्रेत्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ८६ हजार किमतीचा ९ किलो ३०० गॅ्रम गांजा जप्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कारवाईचा वेग वाढणार असल्याचे समजते.