मुंबई : दुचाकी वाहने जाणारा कच्च्या पुलाचा काही भाग कोसळल्याने आठ जण जखमी झाल्याची घटना मालाड मालवणीत रात्रीच्या सुमारास घडली. या पुलाखालून जाणाऱ्या नाल्यात काही वाहने पडून ती वाहून गेली. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.मालाड मालवणी एव्हरशाईन येथे दुचाकी जाणारा कच्चा पुल आहे. रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास या पुलाचा काही भाग कोसळला. त्याचवेळी या पुलावरुन रहदारी सुरु असल्याने त्याचा फटका लोकांना बसला. या घटनेची माहीती मिळताच दोन फायर इंजिन, दोन रेस्क्यु टिम, दोन रुग्णवाहिका व पोलिस दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात केली. या घटनेत आठ जण जखमी झाले. यातील चार जणांना किरकोळ मार लागल्याने त्याचवेळी उपचार करुन सोडून देण्यात आले. तर रियाज शेख (३९), आसिफ घौरी (३९) आणि आकाश भंडारी (१८) या तीन जणांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात एक महिलाही जखमी झाल्याचे अग्निशमन दल आणि महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी फायरब्रिगेड आणि पोलिसांकडून माहीती घेतली जात होती. (प्रतिनिधी)
पुलाचा भाग कोसळून आठ जण जखमी
By admin | Published: December 14, 2015 2:20 AM