तेराव्या मजल्यावरून पडून आठ मजूर जखमी
By admin | Published: February 17, 2016 03:00 AM2016-02-17T03:00:56+5:302016-02-17T03:00:56+5:30
बोरीवलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून आठ मजूर जखमी झाले.
मुंबई : बोरीवलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून आठ मजूर जखमी झाले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून, तिच्यासह दोघांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
बोरीवली पूर्व परिसरात असलेल्या रावळपाडा येथे विकासक विजय चौगुले यांच्या एकदंत अपार्टमेंट्स या तेरा मजल्यांच्या इमारतीचे काम सुरू आहे. बिल्डिंगच्या भिंतीच्या आधाराने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली लाकडी शिडी मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तुटली आणि त्यावर उभे असलेले आठ मजूर एका मागोमाग एक खाली कोसळले. त्यांच्या आरडाओरड्याने शेजाऱ्यांना या प्रकाराची कल्पना आली. त्यांनी तातडीने जखमींना बाहेर काढत, बोरीवलीतील शताब्दी आणि कृष्णा रुग्णालयात दाखल करविले.
या मजुरांची नावे अतापुदिन, टीटू, प्रकाश, मफजुल, बिपिन, मालन्ना, इलइया आणि इलीजा काळे अशी असून, त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बांधकामाबाबत निष्काळजी दाखविल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे परिमंडळ-१२ चे पोलीस उपायुक्त रामकुमार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)