मुंबई : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचा हिंदी चित्रपटसृष्टीलाही हादरा बसला असून, चित्रीकरणासाठी नेपाळमध्ये गेलेल्या एका हिंदी चित्रपटाच्या चमूतील आठ जण भूकंपात मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व लोक स्थानिक होते व चित्रीकरणासाठी त्यांना चमूत सहभागी करून घेण्यात आले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण काठमांडूपासून ८० किलोमीटर अंतरावरील पोखरा येथे सुरू होते. भूकंपाचा केंद्रबिंदू याच भागात असल्याचे सांगण्यात येते. अभिनेता रसलान व अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. रसलान ही आपत्ती कोसळण्याच्या आठ दिवस आधीच मुंबईला परतला होता. मात्र, चित्रपटाचे अनेक तंत्रज्ञ नेपाळमध्येच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चमूतील अनेक जण भूकंपाच्या तडाख्यात सापडले. त्यातील ८ जण मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. रसलान याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांत दोन चालकांचा समावेश आहे. ते त्याला दररोज हॉटेलवरून चित्रीकरण स्थळी नेत असत. मुग्धाने टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, आमच्या चित्रपट चमूतील आठ सदस्यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून मला खूप दु:ख झाले. (प्रतिनिधी)
मुग्धा गोडसेच्या चित्रपट चमूतील आठ जण भूकंपात ठार
By admin | Published: April 29, 2015 2:02 AM