Join us

मुंबईत उभारणार मुलींचे आठ मजली वसतिगृह; ८९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 8:20 AM

राज्य सरकारने बुधवारी दिली मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चर्नी रोड, मुंबई येथे सध्या बंद असलेले उच्च शिक्षण विभागाचे सावित्रीबाई फुले वसतिगृह पाडण्यात येणार आहे. त्याजागी ८९ कोटी, ५१ लाख रुपये खर्चून आठ मजली नवे वसतिगृह उभारण्यास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली.

गेल्या जूनमध्ये या वसतिगृहातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीची वसतिगृहातीलच सुरक्षारक्षकाने हत्या केली होती. त्यानंतर त्याच रात्री सदर सुरक्षारक्षकाने लोकलखाली आत्महत्या केली होती. या घटनेनंतर उच्च शिक्षण खात्यावर टीकेची झोड उठली होती. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर हे वसतिगृह बंद करण्यात आले आणि त्या जागी नवीन वसतिगृह उभारले जाईल, असे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते.

वसतिगृहामध्ये अखेर सीसीटीव्ही बसविणार

 मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीच्या हत्येनंतर या वसतिगृहातील प्रत्येक माळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे प्रकर्षाने समोर आले होते.  ही उणीव दूर करण्यासाठी आता उच्च शिक्षण संचालनालयाच्या मुलींच्या २७ शासकीय वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी साडेतीन कोटी ८५ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :राज्य सरकार