Join us

रामायणाची विटंबना करणाऱ्या नाटकात काम केल्याबद्दल आयआयटीकडून आठ विद्यार्थ्यांना दंड

By रेश्मा शिवडेकर | Updated: June 20, 2024 21:43 IST

३१ मार्च रोजी हे नाटक सादर करण्यात आले होते.

मुंबई- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) वार्षिक कला महोत्सवात रामायणाची कथित विटंबना करणाऱया नाटकात काम केल्याबद्दल संस्थेने आठ विद्यार्थ्यांना १.२० लाखांपर्यंतचा दंड केला आहे. स्त्रीवादी भूमिका मांडणाऱया या नाटकामुळे कुणाच्या भावना दुखावू नयेत, याकरिता पुरेशी काळजी घेण्यात आली होती. तरिही नाटकाचा सामाजिक आशय लक्षात न घेता विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या रकमेचा दंड करण्यात आल्याने आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

३१ मार्च रोजी हे नाटक सादर करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसात नाटकातील कथित विटंबना करणाऱया संवादाचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर फिरू लागल्याने वादाला तोंड फुटले. आयआयटीने विद्यार्थ्यांवर केलेल्या या कठोर दंडात्मक कारवाईमुळे कलात्मक स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे नाटक सुरू असताना प्रेक्षक किंवा परीक्षकांकडून त्यावर कोणतेही नकारात्मक भाष्य केले गेले नव्हते. असे असताना अचानक एका समाजमाध्यमावरील चर्चेनंतर ते आक्षेपार्ह कसे ठरते, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

राहोवन नामक या नाटकाचे कथानक साधारणपणे रामायणावर बेतलेले आहे. नाटकातील पात्रांची नावे बदलण्यात आली होती. यातील राम आणि सीतेवर बेतलेल्या पात्रांचा परस्परांमधील संवाद व वागणूक अपमानास्पद असल्याचा आरोप आहे. तसेच, यातील स्त्री पात्र रावणावर आधारलेल्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

नाटकातील संवाद स्त्रीवादी विचारसरणीची मांडणी करणारे असले तरी त्यामुळे रामायणाची विटंबना होत आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचे हनन होत असल्याचा आक्षेप घेत आयआयटीच्या प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या शिवाय आयआयटी मुंबई भारत नामक समाजमाध्यमावरही या विरोधात आगपाखड करत, नाटकात काम करणाऱे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर करून ठराविक धर्माला लक्ष्य करत असल्याचा आरोप कऱण्यात आला होता.

विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यापूर्वी आयआयटीने ८ मे रोजी शिस्तभंग समितीच्या बैठकीत त्यांची बाजू ऐकून घेतली. मात्र त्यात समाधान न झाल्याने ४ जून रोजी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. २० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना दंडाची रक्कम भरायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना दंड केला गेला आहे, त्यांच्यापैकी कुणीही यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. संस्थेशी चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा करण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. संस्थेकडूनही या बाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

 

टॅग्स :आयआयटी मुंबई