Join us  

पावसाळी आपत्तींच्या सामन्यासाठी आठ हजार आपदा मित्र सज्ज; प्रशिक्षण काळातच वाचवले १२ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 8:44 AM

आपत्तीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देशातील ३६० जिल्ह्यांत आपदा मित्र नियुक्त करण्याची योजना आणली.

- मनोज मोघे लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : एनडीआरएफ, एसडीआरएफ पोहोचण्याआधीच पूर, भूस्खलन, आग यासारख्या आपत्तींमध्ये मदतकार्य सुरू होऊन जीवितहानी टळावी यासाठी आता राज्यभरात ‘आपदा मित्र’ सज्ज झाले आहेत. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत ७९०० स्वयंसेवकांना आपत्ती काळाचा सामना करण्याचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या काळातच या स्वयंसेवकांनी १२ जणांचे विविध आपत्तीतून प्राण वाचवल्याची बाबही समोर आली आहे.  

आपत्तीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देशातील ३६० जिल्ह्यांत आपदा मित्र नियुक्त करण्याची योजना आणली. कोल्हापुरात याचा पथदर्शक प्रकल्प राबवला गेला. महाराष्ट्रातील २० पूरग्रस्त जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. अशा आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील मदतकार्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात २००, ३००, ५०० स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये ६०९६ पुरुष आणि १८०४ महिलांचा समावेश असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात मदतकार्य पार पाडण्यास ते सज्ज झाले आहेत. नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दलाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले असून डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 

सीपीआर ते बेसिक लाइफ सपोर्टची माहिती असल्याने रस्ते अपघात, गर्दी नियंत्रण तसेच पूरसंकटात या टीमचा स्थानिक प्रशासनाला उपयोग होतो आहे. आपदा मित्रमध्ये आणखी काही जिल्ह्यांचा समावेश करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे.

आपदा मित्र ठरले देवदूतप्रशिक्षणादरम्यान आपदा मित्रांनी १२ नागरिकांचे जीव विविध संकटातून वाचवले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनी आग दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल येथील वणवा, जळगाव जिल्ह्यातील गोद्री कुंभमेळा, चंद्रपूर शहरातील आग दुर्घटना तसेच नवी मुंबई आणि मस्जिद बंदर येथील दुर्घटनेत आपदा मित्रांच्या मदतीमुळे जीव वाचू शकले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांनी दिली.

१५ साधनांनी सुसज्ज किटआपदा मित्रांना १५ साधनांचे सुसज्ज किट देण्यात आले आहे. यात गम बूट, लाइफ जॅकेट, चाकू, काेयता, हेल्मेट, टाॅर्च, कुऱ्हाड, कटर यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याला ३० साधने दिली असून त्यामध्ये बोट, जीपीएस, वाॅकी टाॅकी, तंबू अशा साधनांचा समावेश आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमांतून ही टीम जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.

टॅग्स :पाऊस