आठ हजार कुत्र्यांना विशेष मोहिमेत लसीकरणाची मात्रा; रेबीजमुक्तीसाठी महापालिकेचा 'उतारा'
By सीमा महांगडे | Updated: December 16, 2024 13:51 IST2024-12-16T13:50:42+5:302024-12-16T13:51:24+5:30
आतापर्यंत आठ हजारांहून अधिक कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

आठ हजार कुत्र्यांना विशेष मोहिमेत लसीकरणाची मात्रा; रेबीजमुक्तीसाठी महापालिकेचा 'उतारा'
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेने जागतिक रेबीज दिनाचे निमित्त साधून २८ सप्टेंबरपासून मुंबईतील भटक्या कुत्र्यांची रेबीज प्रतिबंध लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांत ही मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत आठ हजारांहून अधिक कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
महापालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने आजवर मुलुंड, भांडुप आणि मालाडमधील श्वानांचे लसीकरण पूर्ण केले आहे. तसेच, सध्या घाटकोपर, गोरेगाव आणि दहिसरमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू आहे. दरम्यान, लसीकरण झालेल्या कुत्र्यांची माहिती नोंदविण्यासाठी यंदा अॅप तयार करण्यात आले असून, त्यात संबंधित श्वानाची आकडेवारी छायाचित्रासह उपलब्ध असणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाच्या माध्यमातून रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू आहे. तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे आणि त्याद्वारे भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राण्यांचे हित साधणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, यावर भर दिला जात आहे.
मार्च २०२५ च्या अखेरपर्यंत ७० टक्के कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे पालिकेचे लक्ष्य असून यासाठी पालिकेच्या वतीने यासाठी चार संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांमधील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.
१,७२,००० कुत्र्यांचे आतापर्यंत लसीकरण
मुंबई पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागातर्फे युथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स, युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संघटनांच्या सहकार्याने रेबीज प्रतिबंध लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या आधी २०१४ पासून ते २०२३ पर्यंत पालिकेकडून १ लाख ७२ हजार कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.