लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सलग पाचव्या दिवशी ८,२९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ६२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,५५,०७० झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार १५४ झाला आहे. राज्यात सध्या ७७ हजार ८ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ३,७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण २०,२४,७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्युदर २.४२ टक्के इतका आहे. नोंद झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३५,४९२ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर ३,३३२ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.