आठ हजार शौचालये, १,३०० कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:13 PM2024-03-03T13:13:23+5:302024-03-03T13:13:34+5:30
संबंधित कंपनीकडून येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगरात व्हॅक्यूम क्लिनिंग मशीन, ब्रशिंग मशीन, रोड क्लिनर अशा प्रकारची अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे.
मुंबई : मुंबईतील आठ हजार शौचालयांची नियमितपणे स्वच्छता केली जाणार आहे. मुंबईतील शौचालयांची स्वच्छता आणि पुनर्बांधणीची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी १३०० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. मुंबईत एकूण आठ हजार सार्वजनिक शौचालये आहेत. त्यापैकी म्हाडाचे तीन हजार शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये सव्वा लाख शौचकुपे आहेत. जागतिक स्तरावरील कंपन्यांना या शौचालयांची स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
लवकरच या प्रत्येक शौचालयासाठी पूर्णवेळ स्वच्छता कर्मचारी तैनात राहणार आहे. संबंधित कंपनीकडून येत्या दोन महिन्यांत मुंबई महानगरात व्हॅक्यूम क्लिनिंग मशीन, ब्रशिंग मशीन, रोड क्लिनर अशा प्रकारची अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक शौचालये अधिक स्वच्छ आढळून येतील, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. सखोल स्वच्छता मोहीमअंतर्गत आज २५ प्रशासकीय विभागात लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
चहल यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासून मोहिमेत सहभाग घेतला. ‘बी’ विभागातील जनाबाई रोकडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, विविध सामाजिक संस्था आणि परिसरातील नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. चहल यांनी काझी सईद मार्ग, रघुनाथ महाराज मंदिर, जंजीकर मार्गाची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यवाहीची तपासणी केली.
साथीच्या रोगांचे प्रमाण घटणार
१४ आठवड्यांपासून मुंबई महानगरात सुरू असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील वायू गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. वायू प्रदूषणामध्ये घट झाली आहे. स्वच्छता मोहिमेमुळे जून महिन्यात संसर्गजन्य, साथजन्य आजारांचे प्रमाण नक्कीच घटलेले आढळेल, असा आशावाद चहल यांनी व्यक्त केला.