Join us  

ट्रान्स हार्बरसाठी राबताहेत आठ हजार कामगारांचे हात; ८४ टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 6:19 AM

१८ हजार कोटी येणार प्रकल्पाला खर्च, हा प्रकल्प चार टप्प्यांत उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पुलाची लांबी १०.५ किमी, दुसऱ्या टप्प्यातील पुलाची लांबी ७.८ किमी, तर तिसऱ्या टप्प्यातील पुलाची लांबी ५.५ किमी आहे. तसेच यासाठी १०८९ पायर्स उभारण्यात येत आहेत. 

उरण  : ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी-न्हावा-शेवा) या प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. अठरा हजार कोटी खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे. देशातील सर्वाधिक २२ किमी लांबीचा हा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प चार टप्प्यांत उभारण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याची मुदत डिसेंबर २०२३ असून, ती पाळण्यासाठी सध्या आठ हजार कामगार अहोरात्र काम करीत असल्याची माहिती एमएमआरडीएचे मुख्य प्रकल्प अधिकारी अतुल वांढेकर यांनी मंगळवारी दिली.  

३५ वर्षांपूर्वी याची योजना आखली; परंतु प्रत्यक्षात १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या कामाला एप्रिल २०१८ पासून सुरुवात झाली. देशातील सर्वांत मोठा समुद्रातून जाणारा पूल ठरणार आहे. तसेच नवी मुंबई ते मुंबई अंतर ५० मिनिटांनी कमी होऊन हे ते केवळ २० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.

चार टप्प्यांत काम हा प्रकल्प चार टप्प्यांत उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पुलाची लांबी १०.५ किमी, दुसऱ्या टप्प्यातील पुलाची लांबी ७.८ किमी, तर तिसऱ्या टप्प्यातील पुलाची लांबी ५.५ किमी आहे. तसेच यासाठी १०८९ पायर्स उभारण्यात येत आहेत. अत्याधुनिक ॲशोट्रॅफिक स्टीलडेन सिस्टीमने बांधकाम केले जात असून, यामध्ये १२० ते १८० मीटर लांबीचे सुमारे ६० स्पॅनची उभारण्यात येत आहेत. तीनही टप्पे मिळून ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मे २०२२ पासून चौथ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये इंटेलिजन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरात आणली जात आहे. ट्रॅफिक नियोजन, टोल कलेक्शन, अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली, कमांड सिस्टीमच्या कामाचाही या चौथ्या पॅकेजमध्ये समावेश आहे.

या कामाची अंतिम मुदत डिसेंबर २०२३ आहे. ती पाळण्यासाठी योग्य प्रकारे व्यवस्थितपणे नियोजन केले आहे. कामाची नियोजित वेळ पाळण्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. - अतुल वांढेकर, मुख्य प्रकल्प अधिकारी