Join us

मिठी नदीत आठ वर्षांनी आढळले आफ्रिकेतील स्थलांतरित फ्लेमिंगो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 1:06 AM

मिठी नदी नाही, तर तिचा नाला झाला आहे. मिठीच्या दोन्ही बाजूंनी भिंत बांधून आपण तिचा गळा घोटत आहोत.

मुंबई : मिठी नदी नाही, तर तिचा नाला झाला आहे. मिठीच्या दोन्ही बाजूंनी भिंत बांधून आपण तिचा गळा घोटत आहोत. मिठी नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडून आपण त्यातील जलचरांना अधिकाधिक धोका निर्माण करत आहोत. एवढेच नव्हे, तर ठिकठिकाणी झालेल्या भरावांमुळे मिठी अरुंद झाल्याने मुंबापुरीतल्या पुराचा धोकाही वाढला आहे; अशा अनेक संकटांचा सामना करत असलेल्या मुंबईतल्या प्रदूषित नदीला चक्क आफ्रिकेतल्या लेसर फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांनी तब्बल आठ वर्षांनी ‘मिठी’ मारली आहे. धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मिठी नदीत पक्षी निरीक्षकांना लेसर फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन झाल्याने, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.मुंबईकरांना हिवाळ्याची चाहूल लागते, तेव्हा या कालावधीत काही स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल होत असतात. यात विशेषत: सिगलसह फ्लेमिंगो या पक्ष्यांचा समावेश असतो. कित्येक मैल अंतर कापत हे स्थलांतरित पक्षी मुंबईच्या खाडी किनारी, समुद्र किनारी, दलदलीच्या जागेत मुक्कामी असतात. सिगल सैबेरियातून तर फ्लेमिंगो आफ्रिकेतून दाखल होतात. काही काळ येथे मुक्काम असलेले हे पक्षी पुन्हा ऋतू बदलानुसार आपआपल्या देशात दाखल होतात. नरिमन पॉइंट येथील समुद्र किनारी सिगल पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर फ्लेमिंगो शिवडीच्या खाडीसह भांडुप येथील तिवरांच्या जंगलालगत निरीक्षणास येतात.भांडुपच्या तुलनेत शिवडी येथे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आढळतात. प्रत्येक वर्षी हे पक्षी शिवडीसह भांडुप नरिमन पॉइंट येथे स्थलांतरित होत असल्याने, त्यांचे निरीक्षण करणे म्हणजे पक्षी निरीक्षकांना पर्वणीच असते.यंदाच्या वर्षाची सुरुवात पक्षी निरीक्षकांसाठी सकारात्मक झाली असून, या वर्षी तब्बल ८ वर्षांनी धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मिठी नदीत लेसर फ्लेमिंगो या आफ्रिकेतील स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन झाले आहे.फ्लेमिंगोच्या जोडीला सिगल पक्षीदेखील निदर्शनास आले असून, येथे फ्लेमिंगोचे दर्शन झाले, याची अपूर्वाई पक्षीनिरीक्षकांना अधिक आहे. या संदर्भात माहिती देताना महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेचे सहायक कार्यक्रम अधिकारी युवराज भारत पाटील यांनी सांगितले की, ८ वर्षांपूर्वी येथील मिठी नदीच्या पाण्याचा वेग किंवा आता जेथे फ्लेमिंगो आढळून आले आहेत, तेथील पाण्याचा वेग अधिक होता. त्यामुळे तेथील परिसर दलदलीचा नव्हता. या कारणामुळे तेथे पक्षी निदर्शनास येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या आठ वर्षांत या परिसरातील दलदलीचे प्रमाण वाढले आहे.>दलदलीमुळे मिळते पुरेसे अन्नलेसर फ्लेमिंगो ज्या ठिकाणी निदर्शनास आले आहेत, त्या ठिकाणी आता दलदलीचा परिसर तयार होत आहे. या परिसरात पक्ष्यांना पोषक असे खाद्यही आहे. यापूर्वी फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यास आवश्यक खाद्य येथे उपलब्ध होत नव्हते. मात्र, आता दलदलीच्या परिसरामुळे फ्लेमिंगोंना आवश्यक खाद्य उपलब्ध होत असल्याने, त्यांचे दर्शन पक्षी निरीक्षकांना येथे होत आहे. फ्लेमिंगो व्यतिरिक्त सिगल या पक्ष्यासह उर्वरित पक्षीही या परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळत असून, महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे तर पक्ष्यांचे माहेरघरच आहे. परिणामी, येथील निसर्ग सातत्याने हिरवाईने नटलेला असल्याने, येथे उद्यानातील झाडांसह पक्षी निरीक्षणासाठी विद्यार्थी आणि निसर्गमित्र येथे सातत्याने दाखल होत असतात, असेही युवराज पाटील यांनी सांगितले.