मुंबई : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत मुंबईच्या ९ शाळांतील १८ बाल संशोधकांनी सुवर्ण कामगिरी करत सुवर्ण पदकांची लयलूट केली. केरळमधील थिरूअनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत मुंबईतील ९ प्रकल्पांची निवड झाली होती. मागील २० वर्षांतील राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मुंबईचा हा उच्चांक होता. राष्ट्रीय स्तरावरील बाल विज्ञान परिषदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या बाल संशोधकांचा गुणगौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या विद्यार्थ्यांमधील विज्ञान संशोधन वृत्तीचा, राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळविणाºया बाल वैज्ञानिकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान डॉ. संतोष टकले यांनी ‘जाणून घेऊया अंतरीक्ष - वैज्ञानिक दृष्टिकोनातून’ या विषयावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या आहेत त्या वेगवेगळ्या कालखंडांत शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांच्या देणग्या आहेत हे आपण विसरू नये, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. डॉ. अनिल मणेकर यांनी प्रकल्प सादरीकरण आणि विज्ञान रंजक प्रयोग या विभागाचे उद्घाटन केले. विज्ञान दिन केवळ साजरा करून आपली प्रगती होणार नाही, त्यासाठी सी.व्ही. रमण, मादाम क्युरी आणि एडिसन यांच्यासारखे खडतर प्रयत्न करावे लागतात, जिज्ञासा जागृत ठेवून अज्ञाताचा शोध घेण्याची आंतरिक इच्छा जोपासली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न राष्ट्रासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना’ या मुख्य विषयावर बाल वैज्ञानिकांनी संशोधनात्मक प्रकल्प बनवले होते. मुंबईतील प्रकल्पांमध्ये बोरीवलीतील आर.सी. पटेल शाळेतील उजाला यादव, शेठ जी.एच. हायस्कूलमधील आदित्य गुप्ता, सेंट जॉन्स हायस्कूलमधील गणेश कुशवाह, मुलुंड येथील जे.जे. अकादमीमधील योहान ठाकूर, भांडुपच्या कॉसमॉस हायस्कूलमधील मुदित मिश्रा. विक्रोळीतील गोदरेज उदयाचल हायस्कूलमधील दोन प्रकल्पांतर्गत इशाना चंद्रा आणि शॉन केविन, चेंबूरमधील श्री सनातन धर्म हायस्कूलची स्नेहा कुंदर, त्याचप्रमाणे माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूलमधील अथर्व गजकोश या विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प या परिषदेत सादर केले होते.
मुंबईतील अठरा बाल वैज्ञानिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 1:53 AM