राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगांवनिवासी संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज यांच्या संप्रदायाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून श्रीगजानन विजय ग्रंथाची ओळख आहे. या ग्रंथाला आता तब्बल आठ दशके पूर्ण झाली आहेत. ह.भ.प. संतकवी दासगणू महाराज यांनी लिहिलेला, संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांचा २१ अध्यायी असा हा चरित्रात्मक ग्रंथ सन १९३९ मध्ये छापील स्वरूपात प्रथम प्रसिद्ध झाला होता.
या ग्रंथाचे आठ दशकांचे पारायण आता पूर्णत्वास गेले आहे.
श्रीगजानन महाराजांनी सन १९१० मध्ये समाधी घेतली. त्यानंतर २९ वर्षांनी, श्रीगजानन विजय ग्रंथाची पहिली आवृत्ती सिद्ध झाली. श्रीगजानन महाराजांचे अवतारकार्य या ग्रंथामध्ये २१ अध्यायांतून मांडले गेले.
शेगांव संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील यांनी श्रीगजानन महाराजांचे अवतारकार्य चरित्ररूपाने लिहिण्यासाठी प्रथम ह.भ.प. लक्ष्मण पांगारकर यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र आपण केवळ गद्य चरित्र लिहितो, असे स्पष्ट करून पांगारकर यांनी शेगांवकर मंडळींना श्रीदासगणू महाराजांकड़े जाण्यास सांगितले.
त्यानुसार सर्व मंडळी श्रीदासगणू महाराजांकडे गेली; तेव्हा त्यांनी या कार्यासाठी लगेच होकार दिला. साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या श्रीदासगणू महाराजांनी, अक्षरशः दिवसाला एक या गतीने या ग्रंथाचे २१ दिवसांत २१ अध्याय लिहून पूर्ण केले.
चौकट:-
अवतारकार्याचा अमृत ठेवा...
- विवेक दिगंबर वैद्य (श्रीगजाजन विजय ग्रंथाचे अभ्यासक)
श्रीगजानन विजय या ग्रंथाचे लेखक श्रीदासगणू महाराज आहेत; तर लेखनिकाचे कार्य छगनकाका बारटक्के, रतनसा सोनोने यांनी पार पाडले आहे. हा ग्रंथ ३६६९ ओव्यांचा असून, या ग्रंथामध्ये श्रीगजानन महाराजांसोबतच्या अनेक भक्तांच्या भावपूर्ण आठवणी संग्रहित केल्या आहेत. हा ग्रंथ म्हणजे श्रीगजानन महाराजांच्या अवतारकार्याचा अमृत ठेवा आहे. या ग्रंथाच्या पारायणाने अपेक्षित फलप्राप्ती होते, असा भाविकांचा श्रद्धाभाव आहे.