Join us

आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब!

By admin | Published: August 06, 2015 2:05 AM

महापालिकेच्या स्थायी समिती सभेने बुधवारी टॅब खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता पालिकेच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांच्या

मुंबई : महापालिकेच्या स्थायी समिती सभेने बुधवारी टॅब खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता पालिकेच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांच्या हातात लवकरच टॅब दिसणार आहेत. यासाठी सुमारे ३३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून ही योजना राबविण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने वचननाम्यात विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा उल्लेख केला होता. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी शिवसेनेच्या या योजनेवर कडाडून टीका केली होती. प्रत्यक्षात शिवसेनेने टॅब थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे स्थायी समितीच्या पटलावर हा मुद्दा येण्यापूर्वीच महापालिकेत सत्तेत वाटा असणाऱ्या भाजपाची गोची झाली. तरीही शिवसेनेच्या टॅब योजनेवर महापालिकेतील विरोधी पक्षांनी कडाडून टीका केलीच.अखेर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी टॅब खरेदीचा प्रस्ताव मांडल्यानंतरही प्रत्यक्षात विरोध न करता विरोधी बाकावरील सदस्यांनी योजनेतील त्रुटींवर बोट ठेवले. चांगल्या योजनेला विरोध नाही. मात्र पहिल्यांदा काही ठरावीक विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करून हा प्रयोग यशस्वी होतो की नाही ते पाहावे, टॅबऐवजी ई-नोटबुकचा पर्याय अजमावून पाहावा, टॅब विद्यार्थ्यांना शाळेतच देणार की घरी नेण्याची परवानगी देणार, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले. महापालिकेच्या मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे टॅब वितरणाचा प्रयोग कितपत यशस्वी होईल. विशेषत: टॅबचे वितरण करण्याऐवजी महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यात यावा, असे महत्त्वाचे मुद्दे विरोधी पक्षांतील सदस्यांनी मांडत हरकती नोंदविल्या. सत्ताधारी वर्गातील सदस्यांनी यावर विरोधकांचा खरपूर समाचार घेत ही योजना म्हणजे महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचाच एक भाग असल्याचे नमूद केले. अखेर सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांनंतर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी टॅब खरेदीच्या प्रस्तावाला मिळालेली अनुकूलता लक्षात घेत या प्रस्तावाला मंजुरी दिली. (प्रतिनिधी)