नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवारांना मिळालेल्या अत्यल्प मतांबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पराभवाला स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरत त्यांना चिकाटीने काम करण्याची सवय नसल्याचे खडेबोल सुनावले.वाशी येथे नवनिर्वाचित महापौर सुधाकर सोनावणे यांच्या सत्कार सोहळ्यावेळी खासदार तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले बोलत होते. महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवारांना मिळालेल्या अत्यल्प मतांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या सभागृहात आजतागायत एकही नगरसेवक निवडून गेलेला नाही. मात्र या प्रयत्नात प्रत्येक निवडणुकीत आरपीआयतर्फे उमेदवार उभे केले जातात. त्यानुसार गत महिन्यात झालेल्या पालिका निवडणुकीत देखील आरपीआयने उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या उमेदवारांनी १० ते २० मते मिळवून पक्षाची अब्रू घालवल्याची खंतही खुद्द आठवले यांना व्यक्त करावी लागली. पराभवाला स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरत त्यांनी चिकाटीने पक्षाचे काम करावे अन्यथा चालते व्हावे, असा इशाराही त्यांनी दिला. आरपीआयच्या प्रत्येक कार्यक्रमांना गर्दी जमत असते. मात्र निवडणुकीच्या वेळी दलितांची मते नेमकी जातात कुठे असा सवाल त्यांनी केला.(प्रतिनिधी)