एकतर मी आत्महत्या करेन किंवा...; चित्रा वाघ वादावर उर्फीचं गंभीर विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 09:34 AM2023-01-04T09:34:16+5:302023-01-04T09:53:22+5:30
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपडे घालून आल्यामुळे उर्फी जावेदवर टीका होत असते
बॉलिवूडमध्ये जिच्या कोणीही नादाला लागत नाही त्या उर्फी जावेदसोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच वाद ओढवून घेतल्याचं दिसून येतंय. तसं, उर्फी जावेदची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर उर्फीच्या नावाची चर्चा रोजचं होत असते. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आलेली उर्फी आपल्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच नेहमीच प्रकाशझोतात असते. त्याच कारणावरुन आता उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात तोकड्या कपड्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे. उर्फीकडून या वादावर आता गंभीर विधान करण्यात आलंय.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपडे घालून आल्यामुळे उर्फी जावेदवर टीका होत असते. मात्र, सोशल मीडियावर केवळ मनोरंजन म्हणून तिच्याकडे पाहिलं जात. पण, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू आहे. एकीकडे चित्रा वाघ यांची उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार, तर दुसरीकडे उर्फीनेही सोशल मीडियावरुन चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देण्याचा धडाकाच लावला आहे. उर्फीने इंस्टाला आणखी स्टोरी शेअर करत गंभीर विधान केलं आहे.
“राजकीय नेत्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण, ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं गंभीर विधान उर्फीने केलं आहे. त्यामुळे, हा वाद कुठेतरी संपुष्टात येईल, असे दिसून येते.
दरम्यान, या दोघींच्या वादात आता शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आले होते. उर्फीने नुकतच एक ट्विट करत चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करुन दिली. 'मी भाजपमध्ये प्रवेश केल्यास चित्रा वाघ यांच्याशी मैत्री करायची वाट पाहू शकत नाही. तुम्हाला संजय आठवतोय का..? भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही संजय राठोड यांच्या सर्व चुका विसरलात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या विरोधात खूप हल्लाबोल केला होता.' असे ट्विट उर्फीनं केलं आहे.