Join us

एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची; जोगेश्वरीत राबवला अभिनव उपक्रम 

By मनोहर कुंभेजकर | Published: March 08, 2023 7:27 PM

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील "एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची" हा उपक्रम राबविला.

मुंबई : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील "एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची" हा उपक्रम राबविला. या अंतर्गत  अंधेरी , विलेपार्ले व जोगेश्वरी पूर्व मधील नागरिकांना व मंडळांना आवाहन केले की,त्यांनी पुरणपोळी होळीत दान न करता ती आपल्याकडे दान करावी. जेणेकरून ती पोळी एखाद्या गरीब गरजू भुकेल्या पोटाची एकावेळची खळगी भरू शकते. 

वर्ष भर पुरणपोळी बघत नाही अश्या गरीबांच्या मुखाला आस्वाद घेता येत नाही. या साठी हा उपक्रम राबवला असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती सहकार्यवाह व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार आणि सह आयोजक गुंदवलीचा मोरया मंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी सांगितले.या उपक्रमाची मूळ संकल्पना जोगेश्वरी पूर्व येथील जनता जागृती मंच यांची आहे.या उपक्रमात अनेक गणेशोत्सव मंडळ व विविध सामाजिक संस्था संघटना व इतर मंडळांनी सहभाग घेतला असे त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया वरून राबवलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.खोक्यात जमा झालेल्या सुमारे १२८ पुरण पोळ्यांचे रात्री पिशव्यांमध्ये व्यवस्थित पॅकिंग केले.त्यानंतर जोगेश्वरी पूर्व येथील बांदेकर वाडी,घास बाजारा जवळील सुभाष नगर येथील रस्त्यावर राहणाऱ्या बेघर नागरिकांना वाटप करण्यात आले.यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि आनंदाने बेघर घरातील सदस्यांनी आणि त्यांच्या चिमूररड्यांनी पुरण पोळीचा आस्वाद घेतला.

तसेच नागरिकांना व मंडळांना केलेल्या आवाहना नुसार अनेकांनी आप आपल्या गरिबांना,तसेच मुक्या प्राण्यांना पुरण पोळ्या दान केल्या. खासकरून मंडळांनी जमा केलेल्या पुरण पोळ्या रात्री पिशव्यांमध्ये पॅकिंग करून दुसऱ्या दिवशी सुभाष नगर मधील बेघर कुटुंबांना वाटून त्यांच्या सोबत रंगपंचमी साजरी केली शिवाजी खैरनार यांनी दिली.

 

टॅग्स :मुंबईहोळी 2023जोगेश्वरी पूर्व