मुरुड : परिसरातील जगन्नाथ वाघे व राजेश मढवी हे मोटारसायकलवरून ३१ डिसेंबरच्या रात्री एकदरा गावात आले असता मोतीराम पाटील यांच्या समर्थकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे एकदरा गावात अशांतता पसरली आहे. या मारहाणीमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून आरोपींविरोधात तडीपारीची कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तहसील कार्यालयासमोर जमलेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार लक्ष्मण गोसावी यांना निवेदन देवून मोतीराम पाटील यांच्यावरील तडीपारीची कारवाई लवकरात लवकर होण्यासाठी शासनास सूचित करावे, अशी मागणी केली आहे. एकदरा गावात अजून मोतीराम पाटील यांची दहशत आहे. त्यांच्यामुळेच गावात रोज छोटे मोठे तंटे घडतात. त्यांना हद्दपार केल्याखेरीज गावात शांतता नांदणार नाही. भांडणाचे मुख्य सूत्रधार मोतीराम पाटीलच आहेत. शासनाकडे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव आहे. त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी व गावात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थ चिंतामणी लोदी यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या शिष्टमंडळात जगन्नाथ वाघरे, राजेश मढवी, नारायण झुजे, ध्रुव लोदी, ललित मढवी, सीताराम पाटील, धर्मी लोदी आदिंसह असंख्य महिलावर्ग उपस्थित होता. तर तडीपारीच्या कारवाईबाबत मोतीराम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, जगन्नाथ वाघरे व राजेश मढवी यांना कोणतीही मारहाण झालेली नाही. उलट हे दोघे मद्यप्राशन करून आले होते व एका गटारात पडले होते त्यांना उचलून आमच्या समर्थकांनी मदत केली. त्यामुळे हे आरोप चुकीचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर मारहाण करण्यात आलेले जगन्नाथ वाघरे यांनी पाटील यांच्या वक्त व्यास विरोध करीत ते खोटे बोलत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
तडीपारीच्या कारवाईसाठी एकदरा ग्रामस्थांचा मोर्चा
By admin | Published: January 01, 2015 11:04 PM