मिलिंद देवरांसोबत मुंबई काँग्रेसची धुरा सांभाळणार एकनाथ गायकवाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 06:47 PM2019-07-26T18:47:40+5:302019-07-26T19:01:02+5:30
एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीत अध्यक्षांसोबत काम करण्यासाठी पाच कार्याध्यक्षांची नेमणूक पक्षश्रेष्ठींनी केली आहे. त्याच धर्तीवर मुंबईकाँग्रेससाठीही तीन कार्याध्यक्ष नेमावेत, अशी मागणी मुंबईचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केली होती. परंतु, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी श्रेष्ठींनी आज काँग्रेसचे निष्ठावंत सदस्य आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
Eknath Gaikwad appointed as Working President of Mumbai Regional Congress Committee (MRCC). pic.twitter.com/qZIyzTbWp9
— ANI (@ANI) July 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये निराशेचं वातावरण आहे. पक्षाला आलेली ही मरगळ झटकून पक्ष पुन्हा नव्याने निवडणुकीला सज्ज करण्याची जबाबदारी नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एकट्यावर भार पडू नये आणि प्रमुख घटकांना, प्रदेशांना न्याय देता यावा, या उद्देशाने थोरात यांच्यासोबत पाच कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. तशीच रचना मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही करावी, अशी इच्छा मिलिंद देवरा यांनी बोलून दाखवली होती.
वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि भाई जगताप या तिघांना मुंबईसाठी कार्याध्यक्ष नेमावं, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. परंतु, काँग्रेसने ज्येष्ठत्वाच्या निकषावर ही जबाबदारी एकनाथ गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे.
गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने झेंडा फडकवला. शिवसेनेचे उमेवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत राहुल शेवाळे यांना 424913 मते पडली. तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 272774 मते पडली. 2009 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते.