जायंट किलर ते सर्व सहमतीचे नेतृत्व, एकनाथ गायकवाड यांचा शुभ्र प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:05 AM2021-04-29T04:05:07+5:302021-04-29T04:05:07+5:30

गौरीशंकर घाळे मुंबई : ‘इंडिया शायनिंय आणि भारत उदय’चा नारा देत अटक बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ...

Eknath Gaikwad's white journey from giant killer to consensus leader | जायंट किलर ते सर्व सहमतीचे नेतृत्व, एकनाथ गायकवाड यांचा शुभ्र प्रवास

जायंट किलर ते सर्व सहमतीचे नेतृत्व, एकनाथ गायकवाड यांचा शुभ्र प्रवास

Next

गौरीशंकर घाळे

मुंबई : ‘इंडिया शायनिंय आणि भारत उदय’चा नारा देत अटक बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार २००४ साली पुन्हा जनादेश मिळवणार, अशीच चर्चा देशभर होती. मात्र, निकाल वेगळे लागले. वाजपेयी सरकारमधील २२ मंत्र्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. मात्र, यापैकी सर्वाधिक चर्चा झाली ती दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाची. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव करत एकनाथ गायकवाड यांनी अत्यंत धक्कादायक निकालाची नोंद केली. या निकालामुळे गायकवाड खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले होते.

सामान्य कुटुंबातून आलेले एकनाथ गायकवाड यांची ओळख शेवटपर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत अशीच राहिली. १९८५ साली सर्वप्रथम ते आमदार म्हणून निवडून आले. तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून ते निवडून आले. धारावी विधानसभा मतदारसंघातील त्यांची पकड कायम होती. एकनाथ गायकवाड लोकसभेत गेल्यानंतर या जागेवरून त्यांची मुलगी आणि राज्याच्या विद्यमान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सातत्याने निवडून येत आहेत. मोदी लाटेत २०१४ साली मुंबईभर काँग्रेसची वाताहत झाली. मात्र, यात अगदीच मोजक्या जागा काँग्रेसला राखता आल्या त्यात धारावी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

आधी २०१४ आणि त्यानंतर २०१९ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी बेताचीच राहिली. दरम्यानच्या काळात मुंबई काँग्रेसमधील गटबाजीने पुन्हा उचल खाल्ली. तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सामूहिक नेतृत्वाची भलामण करत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुंबईचे अध्यक्षपद द्यायचे कुणाकडे, या प्रश्नाला उत्तर मिळत नव्हते. कोणाचेही नाव चर्चेत आले की गटातटाची ओळख पुढे केली जात होती. अखेर सर्वसहमतीचे म्हणून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

Web Title: Eknath Gaikwad's white journey from giant killer to consensus leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.