शिवसेना-भाजपा युतीच्या मनोमिलन बैठकीपासून खडसेंना ठेवले दूर?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 07:44 PM2019-02-18T19:44:42+5:302019-02-18T19:47:41+5:30
शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची घोषणा ही आता केवळ औपचारिकता राहिली आहे. दरम्यान, थोड्याच वेळात मुंबईतील वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
मुंबई - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची घोषणा ही आता केवळ औपचारिकता राहिली आहे. दरम्यान, थोड्याच वेळात मुंबईतील वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेसाठी शिवसेना आणि भाजपाचे अनेक आघाडीचे नेते उपस्थित आहेत. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मात्र या संयुक्त पत्रकार परिषदेला दूर ठेवण्यात आले आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनीच युती तुटल्याची घोषणा केली होती. मात्र 21 फेब्रुवारीला जळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी एकनाथ खडसे हे जळगावमध्ये थांबले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच शिवसेना-भाजपा युतीहोण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा पालघरची जागाही शिवसेनेला देण्यास तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून, सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.