Join us

निष्ठावंत एकनाथ खडसे नक्की कुणाचे? भाजपाचे की विरोधकांचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 2:40 PM

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एकनाथ खडसे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत आदिवासी विकास मंत्र्यांना कोंडीत पकडले. विरोधी पक्षाऐवजी एकनाथ खडसेंनी घेतलेली आक्रमक भूमिकेने मंत्र्याचीही गोची झाली. 

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना पुन्हा डावलल्याने खडसेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली. खडसेंच्या या नाराजीचा फायदा घेत विधानभवनाच्या इमारतीत प्रवेश करताना एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवारांचा हातात हात मिळविला. तर सभागृहात एकनाथ खडसेंनी स्वपक्षीय पक्षाच्या मंत्र्याला झापलं. 

विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सत्ताधारी पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचं राजकारण भाजपाने महाराष्ट्रात केलं. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन राजीनामा दिलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने सोयीस्कररित्या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं आहे. मंत्रिमंडळात खडसेंना स्थान नसल्याने सरकारविरोधात खडसे उघड उघड नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एकनाथ खडसे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत आदिवासी विकास मंत्र्यांना कोंडीत पकडले. विरोधी पक्षाऐवजी एकनाथ खडसेंनी घेतलेली आक्रमक भूमिकेने मंत्र्याचीही गोची झाली. 

सत्ता आली की सत्तेचे गुण अन् अवगुण लागतात; मंत्रिमंडळ विस्तारावर खडसेंची खदखद

आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावरुन एकनाथ खडसेंनी कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात गेल्याचा आरोप केला तर नव्यानेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उत्तरावर खडसेंनी संताप व्यक्त केला.  त्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात होती. या दरम्यान इमारतीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी अजित पवारांच्या हातात हात मिळविला. त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी केली 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना खडसे म्हणाले होते की, गेली 40 वर्षे पक्षवाढीसाठी आम्ही मेहनत घेतले. इतके वर्ष पक्षासाठी झटलो आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. पक्षाची जमीन भुसभुशीत करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे खडसे असले काय नसले काय त्याने काही फरक पडत नाही. भुसभुशीत जमिनीवर कोणतंही पिक घेतलं तरी ते येणारच आहे असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच पक्षात अडवाणींबद्दल जे झाले ते वाईट आहे. पक्षाच्या वाढीसाठी सध्या भाजपाला इतर पक्षातील नेत्यांची गरज आहे. पक्षवाढीसाठी अशा लोकांना पक्षात घेऊन मंत्री केलं जातं असंही खडसेंनी सांगितले होते.   

टॅग्स :एकनाथ खडसेदेवेंद्र फडणवीसअजित पवार