ईडीच्या चौकशीला एकनाथ खडसेही गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:06 AM2020-12-31T04:06:51+5:302020-12-31T04:06:51+5:30
कोराेनाची लक्षणे असल्याचे कारण : १४ दिवसांनंतर होणार चौकशी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत ...
कोराेनाची लक्षणे असल्याचे कारण : १४ दिवसांनंतर होणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यापाठोपाठ माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हेदेखील बुधवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला गैरहजर राहिले. कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी कळविले. त्यामुळे १४ दिवसांंनंतर त्यांना बाेलावण्याचा निर्णय ईडीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुण्यातील भोसरीतील कथित भूखंड गैरव्यवहारप्रकरणी खडसे यांना गेल्या शुक्रवारी ईडीने समन्स बजावले. त्यानुसार, ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे यांनीही हजर राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना कोरोनासदृश लक्षणे असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी करण्यात आली आहे, त्यामुळे सध्या ते चौकशीला उपस्थित राहू शकत नाहीत, असे ईडीला कळविण्यात आल्याचे त्यांची स्नुषा व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, पीएमसी बँकेतील खात्याबाबत चौकशी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा या मंगळवारी ईडीच्या कार्यालयात गेल्या नाहीत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानुसार त्यांना ५ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत ईडीने समन्स बजावले आहेत.
.............................