एकनाथ खडसे यांची ईडीकडून आठ तासांहून अधिक काळ चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:09+5:302021-07-09T04:06:09+5:30

भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या भूखंड ...

Eknath Khadse is being questioned by the ED for more than eight hours | एकनाथ खडसे यांची ईडीकडून आठ तासांहून अधिक काळ चौकशी सुरू

एकनाथ खडसे यांची ईडीकडून आठ तासांहून अधिक काळ चौकशी सुरू

Next

भोसरी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या भूखंड खरेदी गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गुरुवारी आठ तासांपासून चौकशी सुरू आहे. अटकेत असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना समोर बसवून त्यांच्याकडे प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अभयधुनीसह अन्य चार कथित कंपन्यांतून बेसकोम बिंट्कॉन कंपनीच्या मार्फत वर्ग करण्यात आलेल्या रकमेबद्दलही त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असताना खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे व जावई चौधरी यांनी ३.१ भूखंड खरेदी केली आहे. एमआयडीसीतील ही जमीन सरकारी असताना ती बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यात आल्याचा आरोप खडसे कुटुंबीयांवर होत आहे. ईडीने यापूर्वी जानेवारीमध्ये एकनाथ खडसे यांची चौकशी केली होती. चौधरी यांना अटक केल्यानंतर बुधवारी त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारास ते बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात तीन वकिलांसमवेत पोहोचले. त्यापूर्वी दहा वाजता ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार होते, मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ती रद्द करण्यात आली.

खडसे यांच्यासोबत आलेले वकील भोसरी भूखंडप्रकरणी सर्व कागदपत्रे, उच्च न्यायालयाने त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत कठोर कारवाई करण्यास मज्जाव केल्याबद्दलचे आदेश पत्र आणि या प्रकरणात मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेने न्यायालयाच्या आदेशाने तपास करून प्रकरण बंद करणे (सी समरी) बाबतचा अहवाल, आदी दस्तावेज सोबत घेऊन आले होते. ईडीच्या दोघा अधिकाऱ्यांकडून खडसेंची चौकशी सुरू होती. दुपारी अर्धा तास जेवणासाठीचा वेळ वगळता दोन टप्प्यांत आठ तासांहून अधिक काळ त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.

माझ्यावरील कारवाई राजकीय सुडापोटी

खडसेंचा भाजपवर आरोप

भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात आतापर्यंत पाचवेळा चौकशी झाली आहे. त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट झाले नसताना ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे. मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केला आहे.

सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात खडसे चौकशीला हजर होण्यासाठी जात असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असताना ते म्हणाले, ''नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षड्यंत्र सुरू आहे. आठवड्याभरापासून जळगावमध्ये व्हॉट्सॲपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर ‘अभी कुछ होनेवाला है’ असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत आहे; पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, ईडीला चौकशीमध्ये सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. यापुढेही राहील, असे सांगून ते म्हणाले, ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचे नाव होते हे मी वारंवार सांगितले आहे. या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा

फडणवीस सरकारमध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे ३.१ एकर भूखंड त्यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. मूळ ३१ कोटी किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

Web Title: Eknath Khadse is being questioned by the ED for more than eight hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.