"...तर माझ्या आयुष्याचं विमान कधीच लँड झालं नसतं", एकनाथ खडसेंचा CM शिंदेंशी फोनवरुन संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:53 PM2023-11-11T12:53:25+5:302023-11-11T12:54:49+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी जळगाव शहरातील खासगी रुग्णालयातून तातडीने मुंबईला हलवण्यात आलं होतं.
मुंबई-
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी जळगाव शहरातील खासगी रुग्णालयातून तातडीने मुंबईला हलवण्यात आलं होतं. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअरअॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतित सुधारणा झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळीच मदत केल्यानं त्यांचे आभार मानले आहेत. "तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान कधीच लँड झालं नसतं", अशा शब्दात खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करुन आभार व्यक्त केले.
एकनाथ खडसे यांनी यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार शिंदे यांना सांगितला. तसंच आता प्रकृती ठीक असल्याचंही कळवलं. "आपण वेळेवर मदतीला धावून आलात. मदत करने वाला बडा होता है. तुम्ही तातडीनं एअर अॅम्ब्युलन्स पाठवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आपलं विमान जर वेळेवर आलं नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं", असं खडसे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी खडसे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच दिवाळीच्या देखील शुभेच्छा दिल्या. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केलं.
एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती
एकनाथ खडसे जळगावात असताना त्यांना छातीत त्रास जाणवू लागला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात होते. खडसेंना हृदविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच शिंदे यांनी तातडीनं फोन करत खडसे यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करत त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं.
शरद पवारांनीही घेतली भेट
दरम्यान, सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन एकनाथ खडसेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी, खडसे यांच्या पत्नी मंदिकीनी खडसे ह्याही उपस्थित होत्या. शरद पवार यांनी खडसेंसोबत संवाद साधला, त्यावेळी खडसेंनीही त्यांच्याशी बातचीत केली होती. या भेटीचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरुन शेअर केला होता.