Join us  

"मागच्यांना संधी अन् आपल्याला थांबा सांगतात"; विधानसभेच्या पायऱ्यांवरच समोर आली भाजपमधील खदखद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 5:37 PM

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Eknath Khadse : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही सुखद चित्र पाहायला मिळालं. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं आहे. एकीकडे भाजप आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांना कोपरखळ्या मारत होते. तर दुसरीकडे भाजप नेत्यांमधील खदखद कॅमेरात कैद झाली. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या चर्चेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानांमुळे भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व आमदार आणि मंत्री एकमेकांना भेटून चर्चा करत होते. एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ यांचीही विधानसभेच्या पायऱ्यांवर चर्चा सुरु होती. मात्र या चर्चेदरम्यान एकनाथ खडसे यांनी धक्कादायक विधान केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. माधुरी मिसाळ यांच्यासोबत बोलताना एकनाथ खडसे यांनी बाहेरून आलेल्यांना संधी मिळते असं म्हटलं. त्यामुळे भाजप नेत्यांसोबत चर्चा करताना एकनाथ खडसेंनी खदखद व्यक्त केल्याचे म्हटलं जात आहे.

माधुरी मिसाळ यांच्यासोबत बोलताना एकनाथ खडसे यांनी, मागून येणाऱ्यांना संधी मिळते. नव्याने संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असं विधान केले आहे. मात्र हे बोलत असताना एकनाथ खडसे यांनी कोणाचेही नाव घेतलं नाही. त्यामुळे ही चर्चा नेमकी कोणत्या नेत्याबाबत सुरु होती हे समोर आलेलं नाही. दुसरीकडे मात्र एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. भाजपच्या नेत्यांनीही याबाब पुष्टी केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी केव्हा होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे.

टॅग्स :विधानसभाभाजपाएकनाथ खडसेमाधुरी मिसाळदेवेंद्र फडणवीस